पुणे : पुणेकरांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे किल्ले सिंहगडच्या कोंढणपूर फाट्याजवळ वाघाचे दर्शन झाल्याचे पर्यटकांनी सागितले आहे. तसेच, याबाबतची माहिती पर्यटकांनी हवेली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे वन विभाग आणि पोलीस विभाग सतर्क झाले आहेत. यामुळे नागरिकांनीही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, वारजे माळवाडी येथे राहणारे प्रविण वायचळ आणि पूजा वायचळ हे पती-पत्नी सिंहगडावर फिरायला गेले. फिरून सायंकाळी घराकडे जात असताना, साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांना कोंढणपूर फाट्यापासून काही अंतरावर गोळेवाडीच्या बाजूला वाघ दिसला. हा वाघ रस्ता ओलांडत होता. हे पाहून दोघंही प्रचंड घाबरले आणि त्यांनी आरडाओरडा केला. यानंतर त्यांनी इतर पर्यटकांना याबाबत माहिती दिली. या घटनेनंतर दाम्प्त्याने हवेली पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली.
ही माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान हा नक्की वाघच होता का? याबाबतची खात्री करण्याकरीता पायाच्या ठशांची पाहणी करून याबाबत ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने दिली आहे. तसेच याची खात्री पटेपर्यंत नागरिकांनी या परिसरात जाने टाळावे, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.