लहू चव्हाण
पाचगणी : पर्यटन नगरी पाचगणी शहराच्या नावलौकिकात भर पडावी तसेच स्थानिक भूमिपुत्रांना व्यावसायाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी ‘आय लव्ह पाचगणी फेस्टिवल’ साठी पाचगणीकर एका छताखाली एकवटले असून दि. २ ते ४ डिसेंबर रोजी पाचगणी फेस्टिवलचे आयोजन करण्यात आल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
येथील पर्यटनाला चालना मिळावी, स्थानिकांना रोजगाराची संधी मिळावी आणि या शहराचा नावलौकिकात अधिक भर पडावी यासाठी शहरातील सर्व नागरिक, अगदी छोट्या व्यवसायीकांपासून ते शाळा प्रमुख, डेंटिल व्यावसायिक, घोडा गाडीवाले, रोटरी क्लब येथील सार्वजनिक मंडळ, नगरपालिका, पोलीस यंत्रणा इतर शासकीय कार्यालये यांनी हातात हात घालून एकत्र येण्याची संकल्पना पाच वर्षापूर्वी रुजली आणि पांचगणीकर एकत्र येऊन ‘आय लव्ह पांचगणी’ उत्सव उदयास आला.
लाखो पर्यटकांनी या सोहळ्यात चिंब होण्याचा आनंद घेतला सन २०२० मध्ये करोनाचे सावटामुळे दोन वर्ष हा उत्सव खंडित झाला. यावर्षी कोरोनाचे सावट हटल्याने पर्यटकांची पाऊले पर्यटन नगरीकडे फिरकू लागली आहेत.
वर्षाऋतूनंतर निसर्ग आणि जनजीवन सुद्धा खुलल्याने मोकळा श्वास घेत शहरवासी पुन्हा ‘आय लव्ह पांचगणी फेस्टिव्हल’च्या निमित्ताने हा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या या फेस्टिवल मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील काईट फेस्टिवल, ट्रेजर हंट, आर्ट अँड क्राफ्ट गॅलरी, टम ऑफ वॉर, सांस्कृतिक कार्यक्रम, वॉलकिंग प्लाझा लाईव्ह बँड अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरले असून दि. २, ३ व ४ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात फेस्टिवलचा सोहळा होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
यावेळी फेस्टिवलचे अध्यक्ष राजेंद्र भगत, उपाध्यक्ष शिवाजी शिंदे, सेक्रेटरी जयवंत भिलारे, खजिनदार निहाल बागवान आदी संयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.