पुणे : सायबर चोरट्यांनी जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची ११ कोटी ९५ हजार ४३८ रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.
सेक्सटॉर्शन, वीजबिलाच्या नावाखालीही फसवणुकीच्या वेगवेगळ्या तक्रारी सायबर पोलिसांसह शहरातील पोलीस ठाण्यांकडे नागरिकांनी केल्या आहेत.
तसेच, कधी क्रेडिट कार्डच्या नावे तर कधी डेबिट कार्डच्या एक्स्पायरी डेटच्या बहाण्याने चोर फसवणूक करत असतात. कधी केवायसी करण्याच्या बहाण्याने, तर कधी बँकेचे खाते अपडेट करण्याच्या नावाने लोकांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले जातात.
यासोबतच लोन अॅपच्या माध्यमातून अनेक जणांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.
अॅपवरून फसवणुकीच्या २३५ तक्रारी
सायबर चोरटे तुम्हाला मोबाइलवर एक लिंक पाठवून त्या लिंकद्वारे अॅप डाऊनलोड करण्यास सांगतात. तसेच लोन अॅपसुद्धा डाऊनलोड करण्यास सांगून फसवणूक करत असतात. नागरिकांनी सतर्क राहून, कोणतेही अनोळखी अॅप डाऊनलोड करू नये. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत अनोळखी अॅपवरून फसवणूक झाल्याच्या २३५ तक्रारी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे प्राप्त झाल्या आहेत.
तक्रार कोठे आणि कशी कराल?
ऑनलाइन फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा बँक खात्यांच्या ऑनलाइन सेवा बंद करण्याची विनंती अधिकृत हेल्पलाइन नंबरवर करावी.
तसेच लागेचच सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच नजीकच्या पोलीस ठाण्यात देखील तक्रार करता येते. www.cybercrime.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार करावी.