पुणे: पावसाळ्याच्या दिवसांत साप, विंचू आणि इतर विषारी प्राणी उबेच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये किंवा घरांमध्ये आश्रय घेतात. या काळात केलेली थोडीशी निष्काळजीपणा जीवावर बेतू शकते. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील विहीरगाव येथे घडलेली एक घटना या धोक्याची गंभीर जाणीव करून देते.

विहीरगाव येथील १२ वर्षांचा अनुप ईश्वर ढोणे हा मुलगा एका दुर्दैवी घटनेचा बळी ठरला. अनुपने घरात खुंटीला टांगलेल्या आपल्या पँटच्या खिशात हात घातला, तेव्हा तिथे लपलेल्या विंचवाने त्याला दंश केला. सुरुवातीला पालकांनी याकडे दुर्लक्ष करत स्थानिक पातळीवर काही घरगुती उपाय केले. मात्र, योग्य वैद्यकीय उपचारांऐवजी घरगुती उपायांत वेळ गेल्याने मुलाच्या शरीरात विषाचा प्रादुर्भाव वाढला आणि त्याचा रक्तदाब अत्यंत कमी झाला.

अनुपची प्रकृती खालावल्यामुळे त्याला तातडीने चंद्रपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉ. आनंद बेंदले यांच्या देखरेखीखाली त्याला ३ दिवस अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे अनुपला जीवदान मिळाले असून, आता तो धोक्याबाहेर आहे.






