लहू चव्हाण
पाचगणी : विविध शाळेतील विद्यार्थ्यांच्या दमदार परफॉरर्मन्सला ‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. सांस्कृतिक उपक्रमांतर्गत सादर करण्यात आलेली मराठी व हिंदी गीते, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आदी कलाप्रकारांनाही उपस्थितांच्या प्रचंड गर्दीने टाळ्या अन् शिट्ट्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, उपविभागीय पोलिस अधिकारी शितल जानवे- खराडे, अभिनेत्री गौरी इंगवले, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, सहाय्य्क पोलीस निरीक्षक सतिश पवार, माजी नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर, शेखर कासुर्डे, फेस्टिवल टीमने अध्यक्ष राजेंद्र भगत, उपाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील आयोजित पाचगणी फेस्टिवलमध्ये सायंकाळी पाच वाजता विद्यार्थी व प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या कै. भाऊसाहेब भिलारे स्टेडियमवर विद्यार्थ्यांनी ‘आय लव्ह पंचगणी’ हम है पंचगणी या सामूहिक गीताच्या सादरीकरणाने उपस्थित मान्यवर व प्रक्षेकांची मने जिंकली. कार्यक्रमादरम्यान दाखविण्यात आलेल्या टेबल लॅंन्ड पठाराच्या डॉक्युमेंट्रीने पाचगणीकरांचा आनंद द्विगुणित झाला.
मुख्य बाजारपेठेत खाऊ गल्लीचे आयोजन केल्याने पर्यटकांबरोबरच शहर व परिसरातील नागरिकांनी विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सदाबहार गाण्यांच्या कार्यक्रम सादर झाला. एखाद्या गाण्याची उपस्थितांपैकी रसिकांनी केलेली निवड आणि हुकुम सादर केलेली ‘फर्माइश’ ही फेस्टिवल मंचावर दमदार पद्धतीने रंगत गेली.
सकाळी अकरा वाजता टाऊन हाॅल येथे रांगोळी प्रदर्शनाचे व पाचगणी रोटरी क्लब येथे आर्ट गॅलरीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा फेस्टिवल टीम सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले पाचगणीची स्वतंत्र ओळख होत असलेला सांस्कृतिक कलागुणांनी नटलेला ‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिवलसाठी पर्यटकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन केले.