लोणी काळभोर : पुणे : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंधन माफिया प्रविण मडीखांबे व त्याच्या सहकाऱ्यांनी सुमारे आठ महिन्यांपूर्वी आळंदी म्हातोबाची परिसरातील डोंगरात जमिनीखालील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची पाईपलाईन फोडत इंधनचोरी केली होती. मात्र, ही इंधन गळती अद्याप सुरु असल्याने एका शेतकऱ्याच्या विहिरीला पिण्याच्या पाण्याबरोबरच चक्क पेट्रोल-डिझेलचे झरे अजूनही पाझरत आहेत. पण, एचपी कंपनीकडून आळंदी म्हातोबाची येथील शेतकरी अद्यापही वाऱ्यावरच आहेत.
विहिरीत इंधनयुक्त पाणी असल्याने ते पिण्यासाठी धोकादायक बनले असून, शेतकऱ्याला ४ एकर क्षेत्र पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. पेट्रोलियम कंपनीने पाईपलाईनमधून इंधन चोरी झाली नसल्याचा दावा केला होता. मात्र, आठ महिन्यांपासून विहिरीत डिझेलचा पाझर अद्याप सुरुच असल्याने कंपनीने केलेल्या पोकळ दाव्यालाच गळती लागली असून, लिकेज शोधण्यासाठी कंपनीची यंत्रणा कुचकामी ठरली आहे.
संजय सुरेश जवळकर (वय ४०, रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. संजय जवळकर यांच्या शेतातील विहिरीपासून अर्धा किलोमीटर अंतरावरून हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची पाईपलाईन गेलेली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी आठ महिन्यांपूर्वी प्रविण मडीखांबे व त्याच्या दहाहून अधिक सहकाऱ्यांचा आळंदी म्हातोबाची येथील डोंगराच्या भागातील ‘दोन नंबर’चा कारभार उघड करत पेट्रोलियम कंपनीच्या पाईपलाईनमधून होणारी इंधनचोरी समोर आणली होती.
…तर गावाच्या तळ्यातील पाणीही प्रदूषित होण्याचा धोका
शेतकरी संजय जवळकर यांच्या दूषित विहिरीपासून काही अंतरावर गावचे तळे आहे. त्यामुळे इंधनाचा पाझर वेळीच थांबला नाही तर गावाच्या तळ्यातील पाणीही प्रदूषित होण्याचा धोका आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी हे या गंभीर घटनेची दखल घेऊन तातडीने चौकशी करणार का? हा प्रश्न नागरिक विचारु लागले आहेत.
अनेक दिवस लोटले तरीही इंधन गळती सुरूच
इंधनमाफियांनी ज्या ठिकाणाहून पाईपलाईन फोडली होती, ते ठिकाण डोंगर भागात आहे. डोंगरभागातील उंचवट्यावरुन सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरील सखल भागात जवळकर यांच्या शेतातील विहिरीमध्ये डिझेलचा पाझर पाझरत असल्याने पाण्यावर डिझेलचा तवंग आला आहे. तसेच उग्र वास पाण्याला येत आहे. त्यांच्या शेतातील विहिरीत मागील आठ महिन्यांपासून डिझेल इंधन पाझरत आहे. इंधन चोरीसाठी एचपी कंपनीची फोडलेली पाईपलाईन अद्याप तशीच असून, यातून मोठ्या प्रमाणावर इंधन गळती होत आहे.
पाणवठाच दूषित झाल्याने शेतकरी हवालदिल
विशेष बाब म्हणजे संबधित शेतकऱ्याने विहिरीतून निघालेले दहाहून अधिक पेट्रोल-डिझेलचे टँकर लोणी काळभोर येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीला मोफत पुरवल्याचेही पुढे आले आहे. एकीकडे पेट्रोलियम कंपनी इंधनचोरी झाली नसल्याचा कांगावा करत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्याच्या विहिरीतून डिझेल टँकरद्वारे नेत असल्याने एचपी कंपनीतील गौडबंगाल उघड होत आहे. मात्र, यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पाण्याचे स्रोत व पाणवठाच दूषित झाल्याने तो हवालदिल झाला आहे.
विहिरीमध्ये डिझेलचा पाझर सुरूच
पेट्रोल-डिझेल माफिया यांनी आळंदी म्हातोबाची येथील पेट्रोलियम कंपनीच्या पाईपलाईनला भगदाड पाडून डिझेलची चोरी केली होती. यामध्ये कंपनीतील कामगाराचा समावेश असल्याने त्याच्यासह इंधन माफियातील ‘बड्या डॉन’ला जेलवारी झाली होती. या घटनेला काही महिन्यांचा कालावधी लोटला आहे. यानंतरही आळंदी म्हातोबाची येथील डोंगराच्या भागातून गेलेल्या पाईपलाईनमधून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या संजय जवळकर यांच्या विहिरीमध्ये डिझेलचा पाझर सुरूच आहे. यामुळे विहिरीतील पाणी शेतात सोडल्यास पीके जळण्याचा धोका असल्याने संबंधित शेतकऱ्याला चार एकर क्षेत्र पडीक ठेवावे लागले आहे.
कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून निवेदन
याबाबत बोलताना शेतकरी संजय जवळकर म्हणाले, ”हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्याअधिकाऱ्यांनी पाईपलाईनमधील गळती बंद करण्याऐवजी एका मशीनच्या सहाय्याने विहिरीतील दहा ते बारा टॅंकर तेल भरून नेले आहे. विहिरीत पाण्याबरोबरच पेट्रोल-डिझेल पाझरत असल्याने माणसांबरोबर जनावरांसाठी पाणी विष बनल्याने, मला माझी चार एकर शेती पडीक ठेवावी लागली आहे. कंपनी नुकसान भरपाई देत नसल्याने विहिरीतून तेल नेण्यासाठी आलेल्या गाड्या माघारी लावल्या आहेत. तसेच कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे”.