शिरूर: शिरूर शहराबाहेरील पुणे-अहिल्यानगर महामार्गावर पाषाण मळा येथील दुभाजकाजवळ यु-टर्न घेत असलेल्या एन्डेवर मोटारीला भरधाव कंटेनरने मागून जोरदार धडक दिली.त्यानंतर मोटार दुभाजकाजवळ उभ्या असलेल्या दुचाकीवर आदळून विरुद्ध दिशेला गेली.त्याचवेळी समोरून येणाऱ्या शिवाई बसने मोटारीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एन्डेवर चालकासह दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.ही घटना मंगळवारी(दि. ११)सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

या अपघातात वाडेगव्हाण(ता. पारनेर)येथील उद्योजक किशोर नामदेव यादव(वय-३८)आणि शिरूर येथील रहिवासी प्रथमेश प्रकाश लाड(वय ३०,मूळ रा. कुंडल,ता.पलूस,जि.सांगली) यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर यादव हे एन्डेवर (एमएच-१२,एसयू-५५८९)मोटारीने शिरूरला आले होते.काम आटोपून वाडेगव्हाणकडे जात असताना त्यांनी हॉटेल संग्रामसमोरून यु-टर्न घेण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी दुभाजकाजवळ प्रथमेश लाड हे दुचाकीसह(एमएच १० डीयू ५०५२)थांबले होते.एन्डेवरचा वेग कमी होताच मागून आलेल्या भरधाव कंटेनरने मोटारीला जोरदार धडक दिली.त्यामुळे मोटार दुचाकीवर आदळून विरुद्ध दिशेला गेली.त्याचवेळी छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या शिवाई बसने (एमएच-४९,बीझेड-८०६०) मोटारीला धडक दिली.

धडकेत एन्डेवरच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.यात यादव यांचा जागीच मृत्यू झाला,तर लाड हे एन्डेवर आणि बसच्या मध्ये चिरडल्याने ठार झाले. अपघातानंतर कंटेनर चालक न थांबता निघून गेला.
अपघातामुळे पुणे–अहिल्यानगर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली.घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक गोविंद खटींग यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली







