ऋषभ परदेशी

पुणे : राशीन-बेनवडी फाट्याजवळील हॉटेल मातोश्रीसमोर मंगळवारी (दि. ४) दुपारच्या सुमारास इनोव्हा आणि थार या दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात कर्जत येथील सूरज पवार हे गंभीर जखमी झाले असून अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहने समोरासमोर आल्यानंतर झालेल्या जोरदार धडकेमुळे परिसरात मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनांतून बाहेर काढत मदतकार्य सुरू केले. अपघाताची तीव्रता इतकी होती की, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे काही काळ राशीन-कर्जत मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती.

घटनेची माहिती मिळताच शेखर जाधव यांच्या रुग्णवाहिकेद्वारे जखमींना तातडीने कर्जत येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सूरज पवार यांच्यावर उपचार सुरू असून, अन्य दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, त्याबाबत पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे राशीन-कर्जत मार्गावरील वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.







