पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या बीडच्या तुरुंगात न्यायमूर्तींच्या कोठडीत आहे. मात्र, तेथे त्याला विशेष सवलती आणि व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी थेट कारागृह अधीक्षकांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.त्यानंतर आता,खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात हलवण्याची मागणी केली आहे.

धनंजय देशमुख यांनी पत्रात नमूद केल्यानुसार, राजकीय दबावामुळे वाल्मिक कराडला तुरुंगात बेकायदेशीर सुविधा पुरविल्या जात आहेत. इतर कैद्यांच्या नावाने तसेच वकिलांच्या सिमकार्डचा वापर करून तो बाहेरील लोकांशी संपर्क साधत आहे. दुपारी बंदीच्या वेळेत त्याला अधीक्षक कार्यालयात बसवून व्हिडिओ कॉल करण्याची सूट दिली जात आहे. तसेच बराक क्रमांक 9 जवळील फोनजवळ मुद्दाम सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आलेला नाही. या सर्व प्रकारामुळे तो कारागृहातूनच आपल्या टोळीच्या माध्यमातून बीड परिसरात पुन्हा दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

यापूर्वीही त्याला जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी वागणूक मिळाल्याचे उघडकीस आले होते, ज्यानंतर काही पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. हा प्रकार न्यायव्यवस्थेचा अवमान करणारा असल्याचे सांगत त्यांनी खालील मागण्या मांडल्या आहेत:

आरोपी वाल्मिक कराडची बीड तुरुंगातून तातडीने नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात यावी.बीड कारागृहातील सर्व सीसीटीव्ही फुटेज, भेट नोंदवही (व्हिजिटर रजिस्टर) आणि कॉल लॉग जप्त करून वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हावी.
आरोपीला बेकायदेशीर मदत करणाऱ्या कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.पीडित देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा पुनरुच्चारही खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.







