पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026’ च्या परीक्षार्थींना दिलासा देत परीक्षेच्या अर्जाला मुदतवाढ दिली आहे. 5707 पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट होती. मात्र, संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे अनेक उमेदवारांचे अर्ज अपूर्ण राहिले होते. ही बाब लक्षात घेऊन आयोगाने अर्ज करण्यासाठी 10 ऑगस्ट 2026 पर्यंत वेळ वाढवून दिला आहे.

या मेगाभरतीमध्ये विविध शासकीय विभागांमधील 5707 पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय असणारी तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदाची 1539 पदे यामध्ये भरली जाणार आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे.

ज्या उमेदवारांनी यापूर्वीच अर्ज जमा केला आहे, पण काही कागदपत्रे जोडायची बाकी आहेत, त्यांच्यासाठी आयोगाने अर्जात बदल करण्याची ऑनलाईन सुविधा दिली आहे

1.उमेदवारांनी प्रथम mpsconline.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
2. तेथे स्वतःच्या ‘My Account’ (माझे खाते) या विभागामध्ये जावे.
3.परीक्षेच्या नावासमोरील पर्यायावर क्लिक करून उर्वरित माहिती व कागदपत्रे अपडेट करून नोंदणी पूर्ण करावी.
आयोगाने स्पष्ट केले आहे की, अर्जात केलेल्या सर्व दाव्यांनुसार संबंधित अधिकृत प्रमाणपत्रे ऑनलाईन सादर करणे बंधनकारक असेल.
अंतिम दिवशी वेबसाईटवर तांत्रिक ताण येऊन अर्ज भरणे राहून जाऊ नये, यासाठी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. अधिकृत अपडेट्ससाठी mpsc.gov.in किंवा mpsconline.gov.in या संकेतस्थळांचा वापर करावा.






