पुणे :गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत आलेले राज्याचे माजी आरोग्य मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदारतानाजी सावंत हे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर विधानसभा निवडणुकीत मतदारांना आर्थिक आमिष दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक उमेदवार राहुल मोटे यांनी तानाजी सावंत यांच्या निवडीला आव्हान दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिकाही दाखल केली आहे. सावंत यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेप्रकरणी शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना खंडपीठाने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी आता धोक्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तानाजी सावंत यांनी मतदारांना आमिष दाखवण्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. त्यांनी मतदारांना साडी, भांडी, पैसे वाटप केले आहे, याचे पुरावेही जोडले आहेत. याबाबत तानाजी सावंत यांना औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावली आहे. भगिरथ कारखाना तानाजी सावंत यांचे बंधू शिवजी सावंत, क्रांती महिला उद्योग समूहाच्या अर्चना दराडे यांनाही नोटीस देण्यात आली आहे.दरम्यान कोर्टाने जरी नोटीस बजावली असली तरी ती अद्यापपर्यंत सावंत व इतर कोणांना ती नोटीस प्राप्त झाली नसल्याची माहिती तानाजी सावंत यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये तानाजी सावंत हे कॅबिनेट मंत्री होते. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भूम -परांडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत हे विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल मेटे यांचा अवघ्या 1509 मतांनी पराभव केला.