लोणी काळभोर, (पुणे) : लोणीकंद ते थेऊरगाव या रस्त्याच्या कामानिनित्त हा रस्ता बंद करण्यात आला असला तरी त्या ठिकाणी आणखी मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक मार्गावर कॉंक्रिटीकरण करण्यासाठी लोणीकंद ते थेऊरगाव रस्ता रविवार (ता. ०७) ते मंगळवार (ता. ३०) ऑगस्टपर्यंत जड वाहनांसाठी बंदी घालण्याचे आदेश देऊनही या रस्त्यावर सर्रास जड वाहतूक होत असल्याचे चित्र दिसत आहे.
थेऊर गावाकडे जाणऱ्या रत्यावर लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस कार्यरत असूनही पोलिसांदेखत रस्त्यावर दिवसभर जड वाहतूक सुरू आहे. दुचाकी व हलक्या वाहनांची वाहतूक सुरु राहील असेही सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांनी कळविले आहे.
तरीही अवजड वाहने या मार्गावरून जात आहे. तरीही पोलिस कारवाई करत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
लोणीकंद, लोणीकाळभोर वाहतूक विभाग पुणे अंतर्गत वरील कालावधीत थेऊर फाटा, नगर रस्ता ते थेऊर फाटा, सोलापूर रस्ता दरम्यान जड वाहनांस बंदी करण्यास येत आहे. त्यामुळे खराडी बायपास ते हडपसर तसेच वाघोली-केसनंद-वाडेबोल्हाई, पारगाव-केडगाव-चौफुला, पुणे- सोलापुर महामार्ग या रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. मात्र या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरु आहे.
दरम्यान, ही जड वाहतूक हि लोणीकंद, केसनंद, तसेच मांजरी व कोलवडी विभागातून होत आहे. तसेच काही वाहने हि ब्रिजच्या बाजूने ज्या वाहनचालकाला रस्ता माहिती आहे असे चालक थेट गावातून जड वाहतूक करीत आहेत. त्याचा परिणाम काकडे मळा, व ग्रामपंचायत हद्दीतून अवजड वाहने या मार्गावरून जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पोलीसांसमोरूनच वाहतूक…
थेऊर ते लोणीकंद मार्गावर ट्रक, कंटेनर, प्रवासी बस, व अन्य जड वाहतूक सुरूच आहे. थेऊरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या पायथ्याशी दोन पोलीस कार्यरत आहेत. मात्र दिवसभर थांबणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांदेखत ही जड वाहतूक सुरू असून नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
वेळीच कारवाई करण्याची मागणी…
जड वाहतुकीने आम्हाला पायी चालणेदेखील असह्य झाले आहे. तसेच थेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची भिंत जड वाहतुकीतील कंटेनरने पडली आहे. याची दखल घेऊन जड वाहतूक पूर्णतः बंद करून वेळीच कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.