पुणे :पिंपरी-चिंचवड शहरातून एक थरारक घटना समोर आली आहे. फोनवर बोलण्यात मग्न असताना एक तरुण थेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.ही घटना पिंपरी-चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरातील सदाबहार कॉम्प्लेक्स या इमारतीत घडली.

संबंधित तरुण मोबाईलवर सतत फोनवर बोलत होता. बोलण्यात तल्लीन झाल्यामुळे त्याला आजूबाजूच्या परिसराचा अंदाज आला नाही आणि त्याचा तोल अचानक सुटला. तो थेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. खाली पडताना तो एका लोखंडी ग्रिलवर आपटला, ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आहे.
या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडिओ इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजमध्ये तरुण अतिशय वेगात खाली येऊन ग्रिलवर आदळल्याचे स्पष्ट दिसते. दुर्घटनेनंतर तात्काळ त्या तरुणाला पिंपरी-चिंचवडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, तिथे त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

आजकाल चालताना, गाडी चालवताना किंवा अगदी कुठेही वावरताना मोबाईल वापरण्याची वाईट सवय अनेकांना जडली आहे. परंतु, ही सवय किती जीवघेणी ठरू शकते, याची प्रचिती या घटनेने दिली आहे. एका क्षणाच्या दुर्लक्षामुळे आणि फोनच्या व्यसनामुळे किती मोठे नुकसान होऊ शकते, हे या दुर्दैवी घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नागरिकांनी मोबाईलचा वापर करताना सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे.








