उरुळी कांचन : शिंदवणे (ता. हवेली) घाटातील मोठ्या वळणावर मारुती ओम्नी कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात वडील, मुलगी आणि आजोबा असे एकाच कुटुंबातील तिघेजण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (ता. 3) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शिंदवणे गावच्या हद्दीत घडला. जखमींना उपचारासाठी उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महेश नामदेव सोनवणे (वय 42, रा. गोळेगाव वस्ती, लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) हे आपल्या 13 वर्षीय मुलगी आर्या आणि 71 वर्षीय वडील नामदेव कृष्णा सोनवणे यांच्यासह मारुती ओम्नी कारने (एमएच 11 बीव्ही 3230 ) प्रवास करत होते. ते वडिलांच्या उपचारासाठी प्रयागधाम रुग्णालयात आले होते. उपचारानंतर लोणंदच्या दिशेने परत जात असताना शिंदवणे घाटातील मोठ्या वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.
या अपघातात महेश सोनवणे यांच्या डोक्याला, छातीला, उजव्या पायाला आणि डोळ्याला दुखापत झाली. त्यांच्या वडिलांनाही डोके, छाती आणि उजव्या पायाला दुखापत झाली, तर मुलगी आर्या हिच्या हाताला, पायाला, डोळ्याला आणि नाकाला मार लागला. अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून तिघांनाही रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.







