Harshvardhan Patil : दीपक खिलारे/ इंदापूर ( पुणे ) : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षांमध्ये देशातील सर्वसामान्य जनतेच्या प्रगतीसाठी असंख्य विकासाच्या योजना राबवल्या आहेत. त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख वाढत असल्याचे मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड राज्यातील भाजपच्या शानदार विजयाने दाखवून दिले आहे. आता लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत भाजपा 300 प्लसचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण करेल, असा आत्मविश्वास भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक निकालानंतर रविवारी (दि.3) व्यक्त केला.
मध्यप्रदेशमध्ये भाजपने ऐतिहासिक असा विजय मिळवीत सत्ता कायम राखली आहे. तर छत्तीसगड व राजस्थानमध्ये दमदार विजय प्राप्त करीत काँग्रेसकडून सत्ता ताब्यात घेतली आहे. तेलंगणामध्ये भाजपच्या मतांच्या टक्केवारीत व जागांमध्ये वाढ झाल्याने, संपूर्ण भारत देश भाजपमय झाला आहे, असे गौरवोदगार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात ताकदवान व लोकप्रिय नेते झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील भारत देश जगामध्ये महासत्ता म्हणून उदयास येत आहे. तसेच केंद्रातील भाजप सरकारने देशातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक यांच्या प्रगतीसाठी अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. त्याचबरोबर देशातील सर्व जाती-धर्मांचा विश्वास प्राप्त करण्याचे व त्यांना न्याय देण्याचे काम भाजपने केले आहे.
सबका साथ सबका विश्वास सबकी प्रगती या भाजपच्या धोरणास जनतेने साथ दिल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी सर्व मतदारांना धन्यवाद व्यक्त केले. भाजपच्या 4 पैकी 3 राज्यातील या दैदिप्यमान विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले.