लखनऊ: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया या विश्वचषकात चांगली कामगिरी करत आहे. भारत हा एकमेव संघ आहे, ज्याने अद्याप एकही सामना गमावलेला नाही आणि गुणतालिकेत क्रमांक 2 वर आहे. मात्र, याचा अर्थ टीम इंडियाची मोहीम संपली असा होत नाही.
उपांत्य फेरी गाठण्यासाठी आणि पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी भारताला उर्वरित चारही सामने जिंकावे लागतील. त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामनेही जिंकावे लागतील, तरच टीम इंडियाला विश्वविजेतेपद मिळविता येईल. रोहित शर्माला वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी हार्दिक पांड्याची खूप गरज असेल, कारण तो बॉल, बॅट आणि फील्ड या तिन्ही प्रकारांमध्ये चमत्कार करू शकतो.
हार्दिक पांड्या इंग्लंड आणि श्रीलंकेच्या सामन्यातून बाहेर
मात्र, सध्या हार्दिक पांड्या पुढील दोन विश्वचषक सामन्यांमधून बाहेर राहणार आहे. भारताचा पुढील सामना इंग्लंडविरुद्ध आणि त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. या दोन्ही सामन्यात हार्दिक पांड्या खेळू शकणार नाही. पुण्यात बांगलादेश विरुद्धच्या सामन्यादरम्यान हार्दिकला स्वतःच्याच चेंडूवर क्षेत्ररक्षण करताना घोट्याला दुखापत झाली होती, त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला होता.
हार्दिकच्या घोट्याचे स्कॅनिंग करण्यात आले असून डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. आता त्याला इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातूनही वगळण्यात आले आहे. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “हार्दिक पांड्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली आहे आणि कोलकाता येथे होणाऱ्या भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात तो फिट होऊ शकतो.