पुणे : कॅम्प परिसरातील एका बंगल्यातून सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या सराइताला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, एक दुचाकी, रोख रक्कम असा ८ लाख २ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आर्यन अजय माने (वय -२०, रा. भेकराईनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
काही दिवसांपुर्वीच कॅम्प परिसरातील ओल्ड खान रोड येथे एका बंगल्यात चोरीची घटना घडली होती. चोरट्याने बंगल्यात शिरून कपाटाचे लॉक तोडले. त्यानंतर कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत दाखल गुन्ह्यात बंडगार्डन पोलीस आरोपीचा शोध घेत होते.
त्यादरम्यान गुन्ह्यातील संशयीत आरोपी हा इस्कॉन मंदिराशेजारील मोकळ्या जागेत असल्याची माहिती पोलिस अंमलदार ज्ञाना बडे, मनोज भोकरे, प्रदीप शितोळे यांच्या पथकाला मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून मानेला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे परकिय चलन मिळून आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने साथीदारासह गुन्हा केल्याची कबूली दिली.
पोलिसांनी त्याला अटक करून सोन्याचे दागिने, एक दुचाकी असा ८ लाख २ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, मोहन काळे, प्रदीप शितोळे, महेश जाधव, प्रकाश आव्हाड, सारस साळवी यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.