लोणी काळभोर (पुणे): वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे. वृक्ष लागवडीची प्रक्रिया सातत्याने अविरत आपल्याला जबाबदारी समजून सुरु ठेवावी लागणार आहे. नागरिकांच्यातही याबाबतीत मोठ्या प्रमानात जागरुकता वाढली आहे. पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड ही सामाजिक चळवळ बनली पाहिजे व त्यासाठी तहसिलदार या नात्याने हवी मदत करण्यास तयार आहोत असे मत हवेलीच्या तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी लोणी काळभोर येथे व्यक्त केले.
लोणी काळभोर हद्दीतीाल रामदरा परीसरातील वनविभागाच्या जागेत हवेली महसूल विभाग, वनविभाग, हवेली पंचायत समिती, ग्रीन फाऊंडेशन, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, लोणी काळभोर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा समारोप आज करण्यात आला. यावेळी तृप्ती कोलते-पाटील यांनी वरील मत व्यक्त केले.
यावेळी हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, वनपरिक्षेत्र आधिकारी मुकेश सणस, वन परिमंडल आधिकारी एम व्ही सपकाळे, वनरक्षक बळीराम वायकर, जागृती सातारकर, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर, पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सिताराम लांडगे, हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसाहेब काळभोर, सरपंच माधुरी काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज काळभोर, माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर, संगीता काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, भरत काळभोर, ललिता काळभोर, ज्योती काळभोर, प्रियांका काळभोर, ग्रीन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या प्रकल्पाच्या नीलम भूमकर, धनश्री नायर, मीरा टेकवडे, शुभांगी पवार, शांता शिद, अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस आदी उपस्थित होते.
ग्रीन फाऊंडेशनचे वृक्ष लागवडीचे काम अतीशय प्रेरणादायी..
यावेळी बोलतांना तृप्ती कोलते-पाटील म्हणाल्या, रामदारा परीसरात ग्रीन फाऊंडेशनने तब्बल एक लाख वृक्ष लागवडीचे काम हाती घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. रामदारा परीसरात ग्रीन फाऊंडेशन या परीसरात तब्बल एक लाख वृक्ष लागवड करणार ही बाब अतीशय कौतुकास्पद आहे. ग्रीन फाऊंडेशनचे अमित जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी मागिल वर्षभराच्या काळात दहा हजाराहुन अधिक वृक्षाची लागवड केली आहे. व लावलेले वृक्ष जपलेही आहेत. या कामात ग्रीन फाऊंडेशनला सर्वोतोपरी मदत करण्यास तयार आहोत.
यावेळी बोलताना प्रशांत शिर्के म्हणाले, अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा हा समारोपाचा कार्यक्रम आहे. मात्र वृक्षारोपणाची आपण केलेली सुरवात हा जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाच्या उपक्रमाची आपण सुरवात केली आहे. याबद्दल वनविभाग, ग्रीन फाऊंडेशन व ग्रामपंचायत कौतुकास पात्र आहेत.
यावेळी बोलतांना सरपंच माधुरी काळभोर म्हणाल्या, वृक्ष लागवड म्हणजे प्रदूषणमुक्त समाज रचनेची चळवळ आहे. पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी जंगल गरजेचे आहे. अलिकडच्या काळात जंगल निर्मिती शक्य नसली तरी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करता येते. यातून दुष्काळावर मात करणे शक्य आहे. वृक्ष लागवड आणि त्यांचे जतन ही काळाची गरज असल्याचेही माधुरी काळभोर यांनी यावेळी स्पष्ठ केले.