Grampanchayat Election: पुणे : राज्यातील 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. महायुती आणि महाविकास आघाडी अशी ही निवडणूक होती. अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी केल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि काँग्रेसने महायुतीला जोरदार टक्कर दिली. निकालात मात्र महायुतीने बाजी मारल्याचे चित्र दिसत आहे. आमदार रोहित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, डॉ. संजय कुटे, शहाजी बापू पाटील या प्रस्थापितांना त्यांच्या मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे.
आमदार रोहित पवारांना धक्का
रोहित पवार यांच्या जामखेड मतदारसंघात त्यांना जोरदार धक्का बसला आहे. कर्जत मतदारसंघातील निकाल जाहीर आहे. कुंभेफळ आणि खेडगावात भाजपचा सरपंच निवडून आला आहे. तर केवळ एका जागेवर करमणवाडी येथे रोहित पवार यांच्या समर्थकांने बाजी मारली.
दिलीप वळसे पाटील यांची निराशा
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना त्यांच्या मतदारसंघात अनेक ठिकाणी निराशेचा सामना करावा लागला आहे. वळसे पाटील स्वतः प्रचारासाठी उतरून देखील त्यांचा सरपंचपदाचा उमेदवार संतोष टावरे हा पराभूत झाला आहे. तर रवींद्र वळसे पाटील हा शिंदे गटाचा उमेदवार सरपंच म्हणून निवडून आला. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पारगाव येथे आहे. तेथे दिलीप वळसे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार अर्चना ढोबळे पराभूत झाल्या आहेत. येथे शरद पवार गटाच्या श्वेता ढोबळे सरपंच झाल्या आहेत.
अमोल कोल्हेंच्या नारायणागावात ठाकरे गटाचे वर्चस्व
खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आहे. नारायणगाव ग्रामपंचयातीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सत्ता कायम राखली आहे. 17 पैकी 16 उमेदवार विजयी झाले असून, सरपंचपद हे ठाकरे गटाकडे गेले आहे.
बारामतीत अजित पवार ठरले ‘दादा’
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात अजित पवार गटाचे वर्चस्व कायम आहे. कार्यकर्ते गुलालाची उधळण करत, घोषणाबाजी करत, दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करत आहेत. शरद पवार यांना निराशेला सामोरे जावे लागले आहे. (Grampanchayat Election)