पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सरकार दरबारी झालेल्या नोंदीप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीची तारीख राज्य सरकारकडून निश्चित केली जाणार आहे.
राज्य सरकारकडे असलेल्या महापुरूषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांचे नाव समाविष्ट करण्यात येणार असल्याने इतिहासप्रेमींकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
इतिहास तज्ज्ञांच्या मते छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ या दिवशी झाला. मात्र, सरकारकडे अधिकृतरीत्या या दिवसाची नोंद नाही.
राज्यातील इतिहास तज्ज्ञांनी मानलेल्या तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे जयंती साजरी होते. मात्र, सरकारकडून अजूनही ही जन्मतारीख निश्चित करण्यात आलेली नाही. त्यासाठी आता प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने यासंबंधी राज्यातील अकृषी विद्यापीठांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यापीठातील काही इतिहास तज्ज्ञांची एकत्र समिती करून संभाजी महाराजांच्या जयंतीचा दिवस निश्चित केला जाणार आहे.
हा दिवस निश्चित केल्यानंतर राज्याच्या महापुरूषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा समावेश केला जाणार असून सरकारी कार्यालयांमध्ये राज्य सरकारच्या सर्व आस्थापना आणि कार्यालयांमध्ये महाराजांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म दिवसावरून राज्यातील इतिहास तज्ज्ञांमध्ये अनेक वाद होते. या वादामुळे नेमकी तारीख कोणती हे निश्चित करायला सरकारला वेळ लागला होता.
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तसा कोणताही वाद नसून राज्यातील सर्व इतिहास संशोधक, तज्ज्ञांचे जन्मतारखेवर एकमत आहे. या मुळे सरकारला तारीख निश्चित करण्यासाठी वेळ लागणार नाही, असे संशोधकांकडून सांगितले जात आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसंचालक सुजित कुमार उगले म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीची तारीख निश्चित करण्यासाठी आम्ही समिती नेमत आहोत.
यासाठी राज्यातील विद्यापीठांची मदत घेतली जाणार आहे. लवकरच या विद्यापीठातील तज्ज्ञ मंडळी अभ्यास करून तारीख निश्चित करतील. त्यानंतर महापुरूषांच्या यादीत संभाजी महाराजांच्या नावाचा समावेश केला जाईल.”