बंगळुरू : ‘फायर पान’नंतर हल्ली ‘स्मोक पान’ची चर्चा आहे. मात्र या ‘स्मोक पान’मुळे एका मुलीच्या पोटाला छिद्र पडल्याची धक्कादायक घटना बंगळुरूत घडली. प्रकृती बिघडलेल्या या मुलीवर शहरातील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या ही मुलगी आयसीयूमध्ये असून येत्या काही दिवसांत तिला घरी सोडण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एका विवाह सोहळ्यात या मुलीने ‘स्मोक पान’ खाल्ले होते.
पान खाल्ल्यानंतर तिला त्रास होऊ लागला. तिची तब्येत अधिकच बिघडल्याने तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तिची गंभीर स्थिती पाहता डॉक्टरांनी ‘इंट्रा-ऑप ओजीडी स्कोपी’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तिच्यावर शस्त्रक्रिया केली. यापूर्वी अशाच प्रकारचे स्मोक माऊथ फ्रेशनर, स्मोक बिस्किट खाल्ल्यामुळे लोकांना अपाय झाल्याच्या घटना घडल्या आहेत.