लोणी काळभोर : वाई-पाचगणी रस्त्यावर झालेल्या अपघातात लोणी काळभोर (ता. हवेली) येथील अक्षय म्हस्कू काळभोर (वय-26) व सौरभ जालिंदर काळभोर (वय-26) या दोन मित्रांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर लोणी काळभोर येथील स्मशानभूमीत आज (ता.14 )सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक व उद्योजक क्षेत्रातील नागरिकांनी मोठया संख्येने हजेरी लावली होती.
दरम्यान, अक्षय काळभोर व सौरभ काळभोर यांच्या निधनाने लोणी काळभोर गावावर शोककळा पसरली आहे. सौरभच्या पश्चात आई, वडील, पत्नी व नवजात मुलगी असा परिवार आहे. तर अक्षयच्या पश्चात आई, वडील, भाऊ व पत्नी असा परिवार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोणी काळभोर येथील अक्षय काळभोर, सौरभ काळभोर, वैभव काळभोर व बजरंग काळभोर हे चौघेजण मित्र आहेत. ते दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या कारने ( क्र. एमएच १२ क्यूटी ७७११) कोकणात फिरायला गेले होते. होळीचा सण घरी साजरा करण्यासाठी गुरुवारी (ता. 13 )सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले होते. महाबळेश्वर – पाचगणी मार्गे पुण्याला जात असताना, पसरणी घाटातील बुवासाहेब मंदिराजवळ शंभर मीटर अंतरावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर घाट उताराचा अंदाज न आल्याने त्यांची गाडी थेट दोनशे फूट खोल दरीत पाच वाजण्याच्या सुमारास कोसळली.
या अपघाताची माहिती मिळताच, पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण भालचीम, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे व सिद्धनाथवाडी येथील शिवसह्याद्री रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन जखमींना दोराच्या साह्याने खोल दरीतून बाहेर काढले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अनेक वाहने रस्त्यावरच उभी राहिल्याने घाटात दोन्ही बाजूस वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
चारही जखमींना वाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यातील अक्षय काळभोर व सौरभ काळभोर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. तर वैभव काळभोर व बजरंग काळभोर हे दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाई (सातारा) येथील बेलर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे लोणी काळभोर गावावर व काळभोर कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. लोणी काळभोर व कदमवाकवस्ती गाव आज बंद ठेवण्यात आली आहे.