बारामती, (पुणे) : बारामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेसबुक, इंस्टाग्राम तसेच व्हॉट्सॲप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शस्त्रे हातात घेऊन स्टेटस ठेवणाऱ्या 4 आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. योग्य जामीनदार हजर करू न शकल्याने अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी चौघांची थेट मध्यवर्ती कारागृह येरवडा येथे रवानगी केली आहे. या कारवाईमुळे शास्त्रांचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
यश दीपक मोहिते, शुभम उर्फ बाळू काळू जगताप (रा. दोघेही आमराई, बारामती), आदित्य राजू मांढरे (रा. चंद्रमणी नगर, अमराई, बारामती) व अनिकेत केशवकुमार नामदास (रा. दीपनगर भवानीनगर, ता. इंदापूर) अशी साध्या कारावासासाठी रवानगी करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
सोशल मीडियावर फेसबुक, इंस्टाग्राम तसेच व्हॉट्सॲपच्या माध्यमातून शस्त्रे हातात घेऊन स्टेटस ठेवणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचा इशारा बारामती पोलीस प्रशासनाने दिलेला होता, त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलून अप्पर पोलीस अधीक्षक यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोयता हातात घेऊन मिरवणाऱ्या आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. बारामती शहरातील ही पहिलीच कारवाई असून सदरचा प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव हा शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती कार्यालयास पाठवलेला होता. दरम्यान, आरोपी योग्य जामीनदार हजर करू न शकल्याने या चौघांची मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे साध्या कारावासासाठी रवानगी करण्यात आली.
पोलिसांकडून इशारा
यापुढे देखील जागरूक नागरिकांनी अशा पद्धतीचे स्टेटस सोशल माध्यमावर ठेवणाऱ्या इसमांचे स्क्रीन शॉट घेऊन शक्ती नंबरवर किंवा प्रभारी अधिकारी यांना पाठवल्यास त्या आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात येईल व बातमीदार यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे.
शक्ती नंबरचा वापर करण्याचे आवाहन
जागरूक पालकांनी, शिक्षकांनी, तसेच नागरिकांनी शहरातील चौका चौकात टवाळखोरी करणाऱ्या, शाळा महाविद्यालय परिसरात मुलींची छेडछाडी करणाऱ्या, उघड्यावर मद्य प्राशन करणाऱ्या युवकांची माहिती व फोटो शक्ती नंबर 9209394917 वर पाठवावी. त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.