लोणी काळभोर( पुणे) : वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन याबरोबरच किल्ले बनवा सारख्या स्पर्धा घेणारी ग्रीन फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था खूपच महत्वाचे कार्य करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास लहान मुलांना समजून घेण्यासाठी ही स्पर्धा उपयोगी आहे, असे हवेली पंचायत समितीचे माजी सभापती सनी उर्फ युगंधर काळभोर यांनी सांगितले.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथे ग्रीन फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘किल्ले बनवा’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (ता.10) पार पडला. यावेळी युगंधर काळभोर बोलत होते. साधना सहकारी बॅंकेचे संचालक बाळासाहेब कोळपे, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज काळभोर, अमित काळभोर, राजेंद्र ऊर्फ बाप्पू काळभोर यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना युगंधर काळभोर म्हणाले, आपला इतिहास गौरवशाली असून, सध्याच्या काळात लहान मुलांना तो आवर्जून शिकवण्याची गरज आहे. जर आपण इतिहास विसरलो तर आपण भविष्य घडवू शकत नाही, असे काळभोर यांनी म्हटले.
दरम्यान, लोणी काळभोर परिसरातील मुलांनी मोठ्या संख्येने “किल्ले बनवा” स्पर्धेत सहभाग घेतला होता. वेगवेगळ्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या लोणी काळभोरमधील खेळाडूंनाही गौरवण्यात आले. यावेळी नागेश काळभोर यांनीही मनोगत व्यक्त केले.
ग्रीन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे, तालुकाध्यक्ष गणेश काळभोर, मालोबा केसरी महेश काळभोर, सूर्यकांत काळभोर, शिवाजी काळभोर, विशाल लष्कर, नितीन काळभोर, किरण भोसले, स्पर्धक, त्यांचे आई-वडील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी काळभोर यांनी केले तर आभार अमित जगताप यांनी मानले.