पुणे : भोर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. अखेर आज (22 एप्रिल) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
पुण्यातील भोर हा संग्राम थोपटे यांचा विधानसभा मतदारसंघ. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे संग्राम थोपटे हे पुत्र असून भोर तालुक्यात त्यांचा ठसा आहे.सलग तीनवेळा ते पुण्यातील भोर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.
दरम्यान 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांना भोर मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी पक्षातील सक्रियता कमी केली होती.आता थोपटे यांनी केलेल्या भाजप पक्ष प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. अखेर आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान संग्राम थोपटे यांची काँग्रेसचे निष्ठावंत नेत्यांमध्ये ओळख होती. पण भाजप प्रवेशाच्या वेळी काँग्रेसनेच आपल्यावर ही वेळ आणली, अशी टीका संग्राम थोपटे यांनी केली आहे.