नागपंचमीला ग्रामीण भागात झोक्यांचे वेगळेच महत्व आहे. मात्र आता डेरेदार वृक्ष आणि त्याखाली असणारे झोके, उंच झोका घेण्याची परंपरा अन् त्याभोवती पिंगा घालणाऱ्या मैत्रिणी हे चित्र बदलले आहे. आपण आधुनिकतेकडे वाटचाल केल्याने झोके बांधून खेळण्याची आपली परंपरा शहरात व निमशहरी भागात बंद झाली आहे. त्यामुळे हवेली तालुक्याच्या सर्व गावांत मोठ्या झाडांवर दिसणारे झोके दिसेनासे झाले.
वृक्षतोड, आधुनिकरण, डिजीटल क्रांती यामध्ये सणांची पारंपारिकता नष्ट होत आहे. आजच्या नव्या पिढीला झाडाला झोका बांधून खेळणे ही संकल्पना काल्पनिक वाटू लागली. आज काल हे सगळे सणवार हळूहळू काळाच्या पडद्याआड़ जातांना दिसत आहेत. ग्रामीण भागात कमी प्रमाणात हे उत्सव पार पडतात.
आपल्या प्रत्येक सणाचे रूप पालटते आहे. ‘सकरूबा’ हा श्रावणातील ग्रामीण स्त्रियांचा खास उत्सव. पूर्वी मातीपासून ‘सकरूबा’ नावाचा देव केला जायचा. नव्या पिढीतील मुलींना हे उत्सव, हे विधी माहित नाहीत. आजची ग्रामीण स्त्री घराघरांतून शिरकाव झालेल्या टीव्हीपुढे शहरी मानसिकतेच्या, हेव्यादाव्यांच्या कौटुंबिक मालिका पाहणं पसंत करते. गेल्या काही वर्षांत जागतिकीकरणानंतर घराघरांतून टीव्हीच्या माध्यमातून चंगळवादी मनोवृत्तीने जो शिरकाव केला.
त्यामुळे झालेला एक लक्षवेधी बदल ठळकपणे दिसून येतो. पूर्वी ग्रामीण भागात श्रावण महिन्यात वेगवेगळ्या पोथ्यांची पारायणं व्हायची. आज श्रावण महिन्यात ही पोथी वाचणं, ऐकणं एकदम संपून गेलं आहे. सणांमधलेही पारंपरिक अर्थ लोप पावत आहेत. साप शेतातील उंदराचा त्रास कमी करतात, म्हणून त्याची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करण्यात येत असे. साप उपकारकर्ता आहे. त्याला मारू नये म्हणून ही प्रथा.
मानवी स्वभाव उत्सवप्रिय आहे. मात्र आपण सारासार विवेक हरवत गेलो आणि सण साजरे करताना मध्येच आलेल्या अनिष्ट प्रथातून निसर्गाचे, पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहोत. गुढी पाडव्यापासून होळीपर्यंत सर्व सण अवश्य साजरे करावेत. या सणांचे प्रयोजन विशिष्ट हेतूने करण्यात आले आहे. आपली भारतीय संस्कृती ही सण आणि उत्सवप्रिय आहे. आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे सण, उत्सव, प्रथा, परंपरा साजऱ्या केल्या जातात. आपले अनेक सण, उत्सव वा प्रथा- परंपरांचा सबंध हा निसर्गचक्राशी जोडलेला आढळतो.
नागपंचमीला नवविवाहीत मुलींचे सासर, सासरची माणसं, त्यांची वागणूक, नवरा, नवऱ्याचा स्वभाव या सर्व गुजगोष्टी ऐकण्यासाठी माहेर आणि माहेरवाशी उत्सुक झालेले असायचे. पूर्वी ‘सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणात काय घेतले’ हे आईला सांगायला आजच्या सारख्या मोबाईलच्या सोयी नव्हत्या. मुलगी येणार म्हणून आई-वडील आनंदात असायचे. मनातलं ‘असेल-नसेल’ ते माहेरी सांगितलं की नागपंचमीच्या उंच जाणाऱ्या झोक्या बरोबर त्यांचं दुःखही हवेत विरून जायचं.
पूर्वी नागपंचमीच्या दिवशी गावात ठिकठिकाणी झोके बांधलेले असायचे. झोक्याला जसे चढ-उतार असतात तसेच आयुष्याला सुद्धा सुख-दुःखाचे चढ-उतार असतात, याची शिकवण देण्यासाठीच कदाचित ही झोक्याची प्रथा सुरू झालेली असावी. गावात ज्या झाडांना झोके बांधलेले असत, त्यातील काहींनी आता जगाचा निरोप घेतला आहे. काही तोडली गेली आणि काही झोक्यांची आतुरतेने वाट पाहत उभी आहे. मोबाईलमुळे नवविवाहितांच्या सासरकडील गुजगोष्टी ऐकण्यातील उत्सुकता केंव्हाच संपली आहे. पूर्वीची नागपंचमी ही आता इतिहासजमा झाली आहे.
शहरांनी सण साजरे करण्याचे मार्ग असे बदलले तरी, ग्रामीण भाग मात्र परंपरा जपतोय. दरवर्षी आनंदाच्या व्याख्येशी नवं समीकरण जोडलं जात आहे आणि एक एक जुनी परंपरा निसटते आहे. अर्थात काळानुसार सण साजरा करण्याची पद्धत बदलणं आणि आनंदाची समीकरणंही बदलणं साहजिकच आहे. कारण बदल स्वीकारत मार्गक्रमण करणं, हा समाजाचा स्थायीभावच आहे. मात्र आनंदाच्या या नव्या मार्गांवर आरूढ होत असताना, छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारा निर्भेळ आनंद मुठीतून कायमचा निसटू नये.
गेल्या काही दशकांपासून सण आणि उत्सवाचं मूळ स्वरूप आणि हेतू हरवून जात आहे. आज हे सण त्यातल्या उत्सवी रूपाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पुढे आले आहेत. पण त्यांचा हेतू काय आहे ? हे आजच्या तरुणाईला किती माहिती आहे ? हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे. असत्याकडून सत्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे नेणारे आपले सण आहेत. अशीच सकारात्मकता प्रत्येकाकडे यावी, काहीतरी चांगलं करण्याची ऊर्मी मिळावी, आपल्या मूल्य, परंपरा खऱ्या अर्थाने जपण्याची वृत्ती आणि इच्छा प्रत्येकाच्या मनात रुजण्याची गरज आहे.
पत्रकार राजेंद्र बापू काळभोर,
पुणे जिल्हाध्यक्ष,
प्रिंट व डिजीटल मीडिया पत्रकार संघ.