छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सशस्त्र दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील मनेगाव आणि कानडगाव येथील शेतवस्तीवर दरोडेखोरांनी दरोडा टाकून दोन कुटुंबांतील महिला, मुलांसह पाच जणांचे डोके फोडून, सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल साडेतीन लाखांचा ऐवज लांबवला आहे.
मात्र, शिऊर पोलिसांनी वेळीच पाठलाग करत दोन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. तर पसार झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी धाव घेतली असता पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. दरम्यान पोलिसांनी सहा राउंड फायर करून पाच जणांना अटक केली. यात एक फौजदार आणि हवालदार जखमी झाले असून एका दरोडेखोराला पोटात गोळी लागल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, मनेगाव परिसरात साडे अकरा वाजण्याच्या सुमारास शेतवस्तीवर विष्णू पंढरीनाथ सुराशे हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. ८ नोव्हेंबरला रात्री मुलगा रूपेश (२०), पत्नी हिराबाई आणि विष्णू सुराशे हे तिघेजण घराबाहेर ओट्यावर झोपले होते. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी रूपेशवर हल्ला करत डोक्यात चाकूने वार करून लोखंडी गजाने मारहाण करत गंभीर जखमी केले.
मुलांनी आरडा ओरड केल्याने वडील विष्णू सुराशे त्याच्या मदतीला धावले, तोच दरोडेखोरांनी त्यांच्याही पाठीत लोखंडी रॉडने जोरदार हल्ला केला. त्यानंतर हिराबाई यांनाही बेदम मारहाण करत चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील ५० हजारांचे दागिने काढून घेतले. दरोडेखोरांचा आणि सुरासे कुटुंबाचा हौदास जवळपास अर्धा तास सुरू होता.
कन्नड आणि वैजापूर तालुक्यात आठ ठिकाणी नाकाबंदी
या घटनेची माहिती मिळाल्यावर शिऊरचे सपोनि. संदीप पाटील, भरत कमोदकर, विशाल पैठणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. कन्नड आणि वैजापूर तालुक्यात आठ ठिकाणी नाकाबंदी केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दुलत यांच्यावर चाकू हल्ला
पोलिसांनी दरोडेखोरांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, आक्रमक दरोडेखोर शरण आले नाहीत. अखेर उपनिरीक्षक दुलत यांनी हवेत ४ राउंड फायर करून दरोडेखोरांना शरण येण्याची शेवटची संधी असल्याचे कळविले. त्यानंतर आक्रमक दरोडेखोर अमित ऊर्फ अमीनखान कागद चव्हाण (२३, रा. हिंगणी, ता. कोपरगाव) याने दुलत यांच्यावर चाकूने हल्ला चढविला. दुलत आणि त्यांच्या मदतीला धावले अंमलदार निकम यांच्यावरही चाकू हल्ला केला.
दरोडेखोराच्या पोटात घुसली गोळी
दरोडेखोर आक्रमक झाल्याचे पाहून दुलत यांनी त्यांच्या दिशेने २ राउंड फायर केले. त्यातील एक राउंड हुकला, मात्र दुसरा राउंड अमितच्या हातावर लागून त्याच्या पोटात घुसला. तो जखमी झाल्यावर पोलिसांनी शाम बडोद भोसले (वय २७), धीरज भारंब भोसले (१९), पांडुरंग ऊर्फ पांडू भारंब भोसले (२६, रा. पडेगाव, ता. कोपरगाव) आणि परमेश्वर दिलीप काळे (२२, रा. थेरगाव, ता. कर्जत, जि. नगर) यांना अटक केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली.