उरुळी कांचन, (पुणे) : नायगाव (ता. हवेली) येथे बिबट्याने सहा फूट उंचीच्या लोखंडी जाळीवरून उडी मारून केलेल्या हल्ल्यात पाच शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन बोकड व दोन शेळ्यांचा समावेश आहे. या घटनेत नायगाव येथील शेतकरी गुलाब महादू चौधरी यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रविवारी (ता. 05) मध्यरात्री ही घटना घडली आहे. यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून चौधरी यांनी कंपनीशेजारी तार लावून सहा फूट उंचीचे कंपाऊंड केले आहे. मात्र बिबट्याने या सहा फूट उंचीच्या कंपाऊंडवरून उडी मारत चौधरी यांच्या गोठ्यातील पाच शेळ्यांवर हल्ला केला व त्यानंतर बिबट्या पसार झाला.
दरम्यान, सदरची घटना कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी चौधरी यांना सोमवारी (ता. 06) सकाळी कळवली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील शेतकरी करू लागले आहेत. सदरची माहिती वनविभागाला कळविण्यात आली असल्याची माहिती चौधरी यांनी दिली.
याबाबत बोलताना नायगावचे माजी सरपंच गणेश चौधरी म्हणाले, “नायगाव परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असून लोकवस्तीत देखील संध्याकाळच्या वेळेस बिबट्याचा वावर वाढला आहे. वनविभागाने पिंजरा लावून सदर बिबट्यांचा बंदोबस्त करावा.”