पुणे : हवेली तालुक्यातील २० गुंठे ११ चौरस मीटर जागेसाठी एक कोटी २८ लाख ५४ हजार रुपयांचा धनादेश येत्या दोन दिवसांत संबंधित जमीनमालाच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची खात्रीदायक माहिती हवेली उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांनी दिली आहे.
रिंगरोडच्या पूर्व भागातील हवेली तालुक्यातील मुरकुटेनगर येथील २०.११ गुंठे एवढे क्षेत्र संपादित करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्या जागेच्या संबंधित मालकांशी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे. त्यांच्याकडून जागा देण्यासंदर्भात संमती दर्शविण्यात आली असून दर निश्चिती करून त्याची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
त्यानुसार हवेली उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांनी संबंधित जमीन मालकांशी करारानाम्याने संमतीदर्शक निवाडा केला आहे. येत्या दोन दिवसांत त्यांच्या खात्यावर जमिनीची एक कोटी २८ लाख ५४ हजार ८० रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्व हवेलीतील एका गावातील पहिल्या जागेचे भूसंपादन झाले आहे.
शहराभोवतीचा वाहतूक कोंडींचा विळखा सोडविण्याकरीता साकारण्यात येणाऱ्या रिंगरोडसाठी पूर्व भागात हवेलीतील भूसंपादनचा पहिला करारनामा करण्यात आला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिंग रोडचा पर्याय महत्त्वाचा आहे. आता जिल्हा प्रशासन, रस्ते विकास महामंडळाने भूसंपादनासाठी पूर्ण तयारी केली आहे. रिंगरोड पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यांत साकारला जाणार आहे.
संबंधित जमीन मालकांनी त्यांची जागा रिंगरोडसाठी देण्याची संमती दर्शविल्याने हा व्यवहार करण्यात आला. या जागेची ताबापावती येत्या काही दिवसांत केली जाणार आहे. हवेली तालुक्यात मुरकुटेनगर या गावात एकच भूसंपादनासाठीचे क्षेत्र होते. रिंग रोडसाठी पूर्व आणि पश्चिम भागात मिळून २३ गावांमधील जागा संपादित करावी लागणार आहेत. त्यापैकी उर्वरीत जागांसाठी दरनिश्चितीच्या बैठका झाल्या आहेत. त्यानंतर अंतिम बैठका जिल्हाधिकाऱ्यांकडे होणार आहेत. त्यानंतर त्यांच्या रकमा निश्चित करून संबंधित जागा मालकाच्या खात्यात त्या वर्ग केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, रस्ते विकास महामंडळाच्या खात्यात राज्य सरकारने अडीचशे कोटी रुपयांचा निधी रिंगरोडसाठी वर्ग केला आहे. हा निधी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाला आहे. रिंगरोडसाठी जसे भूसंपादन होईल तसा निधी संबंधित प्रांताधिकाऱ्यांमार्फत संबंधित जमीन मालकाच्या खात्यात जमा केला जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
– रिंगरोडची पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांत विभागणी.
– प्रकल्पासाठी १५८५.४७ हेक्टर एवढी जमीन संपादित केली जाणार.
– पूर्व भागातील ४६, तर पश्चिम भागातील ३७ गावांमधून हा रिंगरोड जात आहे.
– पूर्व भागात मावळमधील ११, खेडमधील १२, हवेलीतील १५, पुरंदर तालुक्यातील पाच आणि भोरमधील तीन गावे.
– पश्चिम भागात मावळमधील सहा, मुळशीतील १६, हवेलीतील ११ आणि भोर तालुक्यातील पाच गावांचा समावेश.