पुणे : दिवाळसणाचा प्रारंभ करणारा दिवस म्हणजे वसुबारस. आज वसुबारस आहे. ग्रामीण भागात गवताच्या पेंढीत छोटी पणती लावून गोधनाला ओवाळण्याची प्रथा आहे.हा भारतीय कृषक संस्कृतीतील महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी गृहिणींकडून सूर्यास्तानंतर सवत्स म्हणजे वासरासोबत असलेल्या गाईचे पूजन केले जाते.अनुत्पादक गायींचा सांभाळ करणाऱ्या संस्थांच्या कामाबाबत जाणून घेऊ या!
बहुतांश गोशाळांत सेवाभावी वृत्तीने सांभाळल्या जाणाऱ्या बऱ्याच गायी अनुत्पादक आहेत. मात्र, त्यांच्या शेताचे खत, गोबर गॅस, पंचगव्य, दूध, तुपापासून मिठाईसह औषधीपर्यंत वापर केला जातो.
राज्यात स्वयंसेवी संस्था, धर्मादाय संस्थांमार्फत चालणाऱ्या ८४ गोशाळांमध्ये १३,०३० गायींचा सांभाळ केला जातो. राज्यात शेतकरी आणि गोशाळा असे मिळून १ कोटी ३९ लाख गायींचा सांभाळ केला जातो. देशात ही संख्या १९ कोटी ३४ लाख इतकी आहे.
डांगी, देवणी, गीर, खिल्लारी, थारपरकर, कांकरेज, साहिवाल, लाल कंधारी व अमृतमहल अशा भारतीय गोधनाच्या जाती आहेत. यापैकी डांगी, देवणी, खिल्लारी व लाल कंधारी या महाराष्ट्रातील ४ जाती आहेत.