पुणे : गेल्या काही दिवसापूर्वी महायुती सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला असतानाच, आता केंद्र सरकारनेही देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचं गिफ्ट दिल आहे. मोदी सरकारने ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ (PM-KISAN) या लोकप्रिय योजनेला पुढील पाच वर्षांसाठी, म्हणजेच 2030-2031 पर्यंत वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे . योजनेच्या पुढील टप्प्यासाठी सरकारने तब्बल 3.15 लाख कोटी रुपयांच्या भरीव निधीची तरतूद केली आहे. यासोबतच ‘प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजने’लाही मुदतवाढ देण्याचा महत्त्वाचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे.

सध्या देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. हा 24 वा हप्ता येत्या ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
योजनेशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे:
निधीची तरतूद: पुढील 5 वर्षांसाठी 3.15 लाख कोटी रुपये मंजूर.
आतापर्यंतचा लाभ: आतापर्यंत 23 हप्त्यांच्या माध्यमातून 4.47 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत.
लाभार्थी संख्या: 23 व्या हप्त्याचा लाभ देशातील 9.49कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी घेतला आहे.
महिलांचा सहभाग: या योजनेत महिला शेतकऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असून, दर चार लाभार्थ्यांमागे एका महिला शेतकऱ्याचा यात समावेश आहे.
राज्य सरकारच्या कर्जमाफीनंतर केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता मिटली आहे. पुढील पाच वर्षे दरवर्षी मिळणारी आर्थिक मदत निश्चित झाल्यामुळे देशभरातील बळीराजामध्ये आनंदाचे वातावरण आहे.






