पुणे : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या 2029 पर्यंतच्या ‘नशामुक्त भारत’ मोहिमेला पाठबळ देत आणि महाराष्ट्र शासनाच्या कडक धोरणानुसार, राज्य अमली पदार्थ विरोधी कृती दलाने ड्रग्ज तस्करांविरुद्ध आपली धडक मोहीम आणखी तीव्र केली आहे. या अंतर्गत पुणे पोलिसांच्या बाणेर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याचा पाठपुरावा करत पथकाने दोन परदेशी नागरिकांसह तीन मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

बाणेर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा नोंद क्रमांक 201/2026नुसार, 26 जून 2026 रोजी सुरुवातीला 98 ग्रॅम मेफेड्रोन (MD) ड्रग्जसह तीन जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतरच्या तपासात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणात सुमारे दोन महिने सातत्याने तांत्रिक विश्लेषण, संशयितांची चौकशी आणि पैशांच्या व्यवहारांचा बारकाईने मागोवा घेण्यात आला. या तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे ANTF पथकाने ड्रग्ज पुरवठ्याची संपूर्ण साखळी शोधून काढत खालील आरोपींना बेड्या ठोकल्या:

विक्रम कालेकर (वय ३० वर्षे): रा. कर्जत, जिल्हा रायगड तसेच सिसे सादिओ उर्फ ॲलेक्स (वय ३० वर्षे): सेनेगल देशाचा रहिवासी (सध्या राहणार: डोंबिवली, जिल्हा ठाणे). याच्याकडून 22 ग्रॅम MD ड्रग्ज, 8 मोबाईल आणि 1 लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.
जेले बियास मार्क (वय ३० वर्षे): इस्वातिनी देशाचा रहिवासी (सध्या राहणार: कर्जत, जिल्हा रायगड). याच्याकडून 14 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे .

पोलीस सध्या या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कची मुळे कुठपर्यंत पसरली आहेत आणि स्थानिक पातळीवर कोण-कोण यात सामील आहे, याचा कसून तपास करत आहेत.अमली पदार्थांचे सेवन, विक्री किंवा वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा आहे. अमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापाराबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी त्वरित ANTF शी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव व ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल.
व्हॉट्सॲप संपर्क: 721800073
ई-मेल: spadmin.antf@mahapolice.gov.in






