पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील भोर तालुक्यातील सारोळा गावात गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास वीर रोडवर अमर पवार या तरुणाची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधाच्या संशयावरून हा प्रकार घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमर पवार हा एका महिला आणि तिच्या लहान मुलासोबत रस्त्यावरून जात होता. त्याच वेळी पाठीमागून आलेल्या दीपक मनोहर पाल या परप्रांतीय व्यक्तीने अमरवर अचानक चाकूने हल्ला केला. आरोपीने अमरच्या मान आणि पाठीवर चाकूने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयानक होता की, अमरचा जागीच मृत्यू झाला.

विशेष म्हणजे, ज्या महिलेसोबत अमर जात होता, ती महिला आरोपी दीपक पालची पत्नी होती. आपल्या पत्नीसोबत अमरचे प्रेमसंबंध असल्याचा राग मनात धरून दीपकने त्याचा पाठलाग केला आणि ही हत्या केली. हा सर्व प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घटनेची माहिती मिळताच भोर येथील राजगड पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी दीपक पालचा पाठलाग करून त्याला जागीच ताब्यात घेतले.
राजगड पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे सारोळा आणि आसपासच्या परिसरात तीव्र संताप व भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.







