लोणी काळभोर, ता. 28: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरियांसह कीटकजन्य आजारांचा धोका वाढत असताना पुणे आरोग्य विभागाच्या मलेरिया पथकाने लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत आरोग्य सुविधांची व कामकाजाची सविस्तर पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील विविध नोंदवह्या, गरोदर मातांचे रजिस्टर, कीटकजन्य आजारासंदर्भातील नोंदी तसेच रक्त तपासणीची प्रक्रिया तपासण्यात आली आहे.

मलेरिया विभागाचे सहसंचालक डॉ. सर्निकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपलब्ध आरोग्य सुविधा, कामकाजाचे दप्तर आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारांची माहिती शुक्रवारी (ता.28) घेतली. या पाहणीवेळी आरोग्य पर्यवेक्षक संजय मिसाळ, कीटक संकलक संदीप गोरे, लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहबूब लुकडे, डॉ. डी. जे. जाधव, आरोग्य कर्मचारी राजू पौनिकर, परिचारिका तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मलेरिया विभागाकडून डेंग्यू, मलेरिया तसेच इतर कीटकजन्य आजारांबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच गरोदर मातांच्या आरोग्याची नोंद ठेवणारे रजिस्टर तपासण्यात आले. संशयित रुग्णांच्या रक्त तपासणीसह कीटकजन्य आजारांच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचीही पाहणी करण्यात आली.

“रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची वेळेत आणि योग्य पद्धतीने तपासणी करून आवश्यकतेनुसार तातडीने औषधोपचार करण्यात यावा. डेंग्यू-मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांबाबत विशेष दक्षता घ्यावी,” अशा सूचना डॉ. सर्निकर यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाज आणि रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.






