युनूस तांबोळी
शिरूर : उभ्या बाजरीच्या कणसाने डोलणारी शेतशिवार यामुळे पक्षांनाही या वर्षी चारा चांगलाच उपलब्ध झाला आहे. मात्र अधून मधून सुटणारा वारा आणि पावसाच्या सरी यामुळे शिरूर तालुक्यात बाजरीचे पिक पडू लागले आहे. शेतकरी मात्र ओलीच कणसे तोडून जमेल तसे मळणी करून घेऊ लागले आहे. बाजरीच्या कणसाला टपोरे दाणे असल्याने या वर्षी उत्तम बाजरीचे पिक मिळण्याची आशा शेतकऱ्यांनाआहे.
खरीप हंगामात बाजरीचे पिक घेऊन शेतकरी वर्षाभराची चंदी गोळा करून ठेवत असतो. मुख्यतः बाजरी खाण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. सध्या जरी स्वस्त धान्य दुकानात कमी दरात गहू मिळत असला तरी या परिसरात बाजरी ची भाकर खाण्याकडेच कल असतो. शेतकरी ऊस, गहू व इतर पाल्याभाज्या पिकवत असला तरी देखील कुटूंबाच्या खाण्यापुरते बाजरीचे पिक हमखास घेत असतो.
आंतरराष्ट्रिय कृषी संशोधन केंद्राने बायोफर्टीफाईड बाजरी ही कुपोषण मुक्तीसाठी उपयुक्त असल्याचा दावा केला आहे. रोजच्या आहारात बाजरी ही पोषण दृष्ट्या उत्कृष्ट लोह आणि जस्त यासारख्या सुक्ष्म पोषक घटकांनी उपयुक्त आहे. सर्वांच्या आहारासाठी उपयुक्त ठरणारी बाजरी हे उत्तम पिक असल्याचा दावा संशोधक करतात. तालुक्यात अल्पभुधारक व कोरडवाहू शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजरीचे पिक घेताना दिसतात.
शिरूर तालुक्यात धरणाच्या पाण्याने नद्यांना नवसंजीवनी मिळाली. त्यातून आठ महिने पाण्याचे व्यवस्थापन होऊ लागले. त्यामुळे नगदी पिकाच्या उत्पादनासाठी शेतकरी पुढाकार घेऊ लागला. यामुळे ८० ते ९० टक्के क्षेत्र हे बागायती क्षेत्र तयार झाले आहे. शेतकरी देखील कमी वेळेत अधिक उत्पादने घेऊन स्वतःचा आर्थीक स्तर उंचावू लागला आहे. इतर पिकामुळे त्याचप्रमाणे खर्च व मजूरीचा ताळमेळ घालताना बाजरी ची पिक न घेण्याकडे शेतकऱ्यांची मानसिकता आहे. पाणी व्यवस्थापनामुळे उन्हाळ्यात देखील काही शेतकरी बाजरीचे पिक घेतात.
याबाबत बोलताना शिरूरचे कृषी पर्यवेक्षक ए. बी. जोरी म्हणाले, या वर्षी पावसाचे प्रमाण पहाता बाजरीचे चांगले उत्पादन मिळणार आहे. मात्र पावसाच्या सरीमुळे उत्तम आलेले बाजरीचे पिक धोक्यात आहे. मिळेल तसे काम करून शेतकरी सध्या बाजरीच्या पिकाची मळणी करताना दिसू लागला आहे.