दौंड, (पुणे) : उसतोडीसाठी मजूर व वाहतूक व्यवस्था करण्यासाठी दिलेली आर्थिक रक्कम देऊनही संबंधित व्यक्तीने कोणतेही मजूर पुरवले नसल्याने रावणगाव (ता. दौंड) येथील शेतकऱ्याची तब्बल 16 लाख 46 हजार 242 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात जळगाव येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल आत्माराम भिल (रा. नांदखुर्द ता. एरंडोल जि. जळगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दादासो निवृत्ती आटोळे (वय 47 धंदा- शेती, रा. रावणगाव, ता. दौड), यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादासो आटोळे यांनी आरोपी अनिल भिल यांना 16 लाख 46 हजार 242 रुपये दिले होते. पैसे घेवुन दौड शुगर साखर कारखाना आलेगाव येथे उस तोड करणारे मजुर आजपर्यत पुरवले नाहीत. तसेच ट्रक्टर टोळीचा उसतोडणी वाहतुक करार केलेला आहे त्याचेकडे वारंवार पैसे मागुन ही त्याने आटोळे यांना पैसे परत दिलेले नाहीत.
दरम्यान, याप्रकरणी दादासो आटोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अनिल भिल याच्यावर 313/2025, भादंवि कलम 418 (4) अंतर्गत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक 1215 रोटे यांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुंभार हे करत आहेत.