फुरसुंगी, ता. ३० : पुणे शहरात सुरू असलेल्या ऑलआऊट आणि कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान फुरसुंगी पोलिसांनी मोठी कारवाई करत एका संशयिताच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. विशेष म्हणजे, शहरात शस्त्रबंदीचे आदेश लागू असतानाही आरोपी विनापरवाना अग्निशस्त्र बाळगत असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी मंगेश विलास मोडक (वय ३६, रा. वलवा वस्ती, वडकी, ता. हवेली, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार अवैध धंदे, फरार आरोपी, तडीपार गुन्हेगार आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत २८ मे रोजी रात्री फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बापुसाहेब खंदारे, पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार व तपास पथकातील अधिकारी-कर्मचारी परिसरात गस्त घालत होते.
दरम्यान, परदेशी मळा परिसरात एका इसमाकडे पिस्तूल असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचला. ऊरुळी देवाची ते फुरसुंगी मार्गावरील मोकळ्या जागेत संशयित इसम उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला जागीच पकडले. पंचांसमक्ष झडती घेतली असता आरोपीच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. तसेच पिस्तूलच्या मॅगझीनमध्ये दोन जिवंत काडतुसेही सापडली. याबाबत परवान्याची विचारणा केली असता आरोपीकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ४१ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. चौकशीदरम्यान हे पिस्तूल त्याचा मित्र शुभम खराडे (रा. इंदापूर) याने ठेवण्यासाठी दिल्याचा दावा आरोपीने केला आहे. पोलिसांकडून या दाव्याची पडताळणी सुरू असून शस्त्राचा मूळ स्रोत शोधण्याचे काम सुरू आहे.
विशेष म्हणजे, पुणे शहरात २६ मे ते ८ जून या कालावधीत शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही आरोपी अग्निशस्त्र बाळगत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) व १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे फुरसुंगी परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, आगामी काळात अशा कारवाया आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.







