पुणे: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या जागेसाठी विविध नावांची चर्चा सुरू असताना भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा रंगली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी या चर्चांना पूर्णविराम देत नवनीत राणा यांच्या उमेदवारीचा विषय संपल्याचे स्पष्ट केले आहे. (Maharashtra Politics)

सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर मानले जात होते. त्यानंतर अचानक नवनीत राणा यांचे नाव चर्चेत आले. यामुळे राज्यसभेच्या जागेवरून राजकीय तर्कवितर्कांना वेग आला होता. नवनीत राणा यांनी मुंबईतील ‘देवगिरी’ निवासस्थानी जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखी हवा मिळाली होती.

मात्र, माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले. पक्षाच्या कोर कमिटीची बैठक होणार असून वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी कोणाची निवड होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या विषयावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत छगन भुजबळ यांना संधी द्यावी, असे मत व्यक्त केले होते. तसेच इतर पक्षाशी संबंधित व्यक्तीला उमेदवारी दिल्यास चुकीचा संदेश जाऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले होते.
रोहित पवार यांच्या या वक्तव्यावर सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आमच्या पक्षाने कोणाला उमेदवारी द्यायची हा आमचा अंतर्गत विषय असून त्यासाठी इतरांचा सल्ला घेण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच रोहित पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकडे अधिक लक्ष द्यावे, असा टोला देखील त्यांनी लगावला. राज्यसभेच्या या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकी कोणाची वर्णी लागणार, याबाबतचा निर्णय आता पक्षाच्या वरिष्ठ बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.







