पुणे : शहरात सध्या ‘पुणे पुस्तक महोत्सव’ सुरू असून त्याला पुणेकर भरभरून प्रतिसाद देत आहेत. शहरातील वाचकही या पुस्तक महोत्सवला भेट देण्यासाठी आवर्जून गर्दी करताना दिसत आहेत. अशातच शनिवारी बूक फेस्टिव्हलला आपल्या नृत्यानं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना भुरळ घालणारी गौतमी पाटील हिने भेट दिली. यावेळी गौतमीने पुणेकर वाचकांचे कौतुक करत तिला काय वाचायला आवडेल याची माहिती देत येथे आलेल्या नागरिकांशी संवाद साधला.
नेमकं काय म्हणाली गौतमी पाटील?
मी कधीही पुस्तक वाचलं नाही. कारण मला लहानपणापासूनच डान्सबद्दल आकर्षण होतं. तसंच माझ्या संघर्षाबाबत सर्वानाच माहिती आहे. मी नाचायला जात असते. आज मात्र मी नाचायला नाही तर इथं पुस्तक वाचायला आली आहे. या पुस्तक महोत्सवामध्ये येऊन मला खूप आनंद झाला. आतापर्यंत मी वाचनासाठी वेळ काढत नव्हते. पण आता रिकाम्या वेळेत वाचनाची ही चांगली सवय जोपासणार असल्याचं तिनं सांगितलं.
पुण्यात एवढा मोठा पुस्तक महोत्सव भरला आहे. आजपर्यंत मला पुस्तकं वाचायची संधी तर मिळाली नाही, पण आज इथे येऊन पुस्तकांच्या या दुनियेत मी फेरफटका मारणार आहे. इथून पुढे मी पुस्तकं नक्की वाचणार आहे, तुम्ही सगळ्यांनीही आवर्जून पुस्तकं वाचा असं आवाहन तिने केलं. पुस्तक ही खूप छान गोष्ट आहे , त्यातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळतं, मीही आता वाचाणार आहे, तु्म्हीही सर्वांनी नक्की वाचा, असा आग्रह गौतमीने केला आहे.
तसेच पुढे बोलताना गौतमी म्हणाली, पुस्तक प्रदर्शनात येताना कोणती पुस्तकं घ्यायची व कोणती वाचायची हे ठरवून आले नाही. प्रवीण तरडे दादांना मी सांगितलं की, तुम्ही मला काही पुस्तकांची नावं सुचवा तसेच मी कोणती पुस्तकं घेऊ ते सांगा. पण मी, छत्रपती शिवाजी महाराजाचं पुस्तक नक्की घेणार असून ते आवडीने वाचणार असल्याचेही गौतमीने सांगितले.