सागर घरत
करमाळा : मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांचे करमाळ्यात १५ नोव्हेंबर रोजी आगमन होत आहे. पण त्यापूर्वीच करमाळा तालुक्यामध्ये तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत तब्बल १७ हजार ५५६ कागदपत्रे तपासली असून यामध्ये २ हजार २०८ कुणबी मराठा नोंदी आढळल्याची माहिती समोर आली आहे. तर अजूनही कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली. त्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे पाटील यांची चर्चा झाली. त्यातून कुणबी समाजाच्या नोंदी आढळल्यानंतर दाखले देण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा फायदा आता करमाळ्यातील विद्यार्थ्यांना होताना दिसणार आहे. आतापर्यंत १७ हजार ५५६ कागदपत्रे तपासण्यात आली आहेत. त्यामध्ये २ हजार २०८ कुणबी नोंदी आढळल्या आहेत.
मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज कुणबी मध्ये असल्याबाबत आग्रह धरून त्यांना कुणबी दाखले द्यावेत अशी मागणी केल्यानंतर आता गावोगावी कुणबीचे दाखले तपासण्याचे काम सुरू आहे. या निमित्ताने करमाळा तालुक्यातही कडई पत्रक, जुने अभिलेख व जन्म नोंदणी वरून कुणबी दाखले तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कागदपत्रापैकी काही कागदपत्रे हे जीर्ण झाल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून सदरच्या कागदपत्रांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत २ हजार २०८ कागदपत्रे मध्ये कुणबी नोंद आढळली असल्याने त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यापूर्वी ज्याला कुणबी प्रमाणपत्र काढायचं आहे किंवा तसा उल्लेख असलेली कागदपत्रे मिळून येत होती त्या संबंधित व्यक्तीने आपले सर्व कागदपत्र घेऊन तहसील कार्यालयाकडे जावे लागत होते. पण आता जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यामुळे सर्व दाखल्यांची तपासणी केली जात आहे. व त्यातून कुणबी जात प्रमाणपत्र उल्लेख असलेली दाखले शोधून संबंधित व्यक्तीला दाखला देण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे आतापर्यंत मिळालेल्या २ हजार २०८ नोंदीमुळे आणखीन कुणबी नोंदी आढळून येऊ शकतात अशी शक्यता आहे.