दौंड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. येत्या १५ ऑक्टोबरला ते प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट देखील घेतली आहे. थोरात यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी पुण्यातील निसर्ग कार्यालयात मुलाखती नुकत्याच पार पडल्या. शनिवारी मराठवाड्यातील अनेक इच्छुकांनी शरद पवार यांना भेटून उमेदवारीसंबंधी चर्चा केली. तर रविवारी रात्री बारामती शेजारील दौंड विधानसभेच्या इच्छुक उमदेवारांची एक बैठक पवार यांनी मोदीबागेतील निवासस्थानी घेतली.
या बैठकीला माजी आमदार रमेश थोरात, शरद पवार गटाचे दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, डॉ. भरत खळदकर, वंदना मोहिते, दिग्विजय जेधे हे पाचही इच्छुक उमेदवार उपस्थितीत होते. दौंड विधानसभेच्या जागेसंदर्भात आणि उमेदवारीसंदर्भात शरद पवार यांनी पाचही इच्छुक उमेदवारांशी चर्चा केली.
रमेश थोरात पुन्हा घरवापसी करणार
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचे सूत्र ठरलेले असून ‘जिथे ज्याचा आमदार, तिथली जागा त्या पक्षाकडे’ यानुसार दौंडमध्ये भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्याकडेच ही जागा जाणार असल्याने त्यांचे परंपरागत विरोधक रमेश थोरात त्यांचा पुढील ‘मार्ग’ शोधत होते. आता त्यांचा शोध संपला असून ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहे.
याविषयी बोलताना माजी आमदार रमेश थोरात म्हणाले की, महायुतीत जागा भाजपला जाणार हे मला माहिती आहे. गेल्या ४० वर्षांपासून राजकारण करतोय. त्यामुळे तालुका-जिल्हा तसेच राज्याचे राजकारण बऱ्यापैकी जाणतो. परंतु, मी तालुक्यात फिरत असताना, गावागावात जाऊन लोकांशी बोलल्यानंतर मला निवडणूक लढविण्याविषयी लोकांमधून कमालीचा आग्रह आहे, असे देखील रमेश थोरात म्हणाले.