विजय लोखंडे
वाघोली : वाघोली येथील वाहतुकीस अडथळा ठरणारे विद्युत पोल काढून त्याची भूमिगत लाईन करण्याच्या कामाची पाहणी स्वीकृत नगरसेवक शांताराम कटके, संदीप सातव व महावितरणचे सहाय्यक अभियंता दिपक बाबर यांनी केली. पीएमसी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या कामाचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
लोहगाव चौकातील ३ ते ४ विद्युत पोल काढणे, नगर रोड केसनंद फाटा, पेट्रोल पंप ते आव्हाळवाडी फाटा येथील ७ ते ८ विद्युत पोलचे स्थलांतर होणार असल्याचे कटके यांनी सांगितले.
या कामासाठी पीएमसीकडून ८४ लाख तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ३५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूकीस अडथळा ठरणाऱ्या व धोकादायक असणाऱ्या विद्युत पोलचे काम लवकरच पूर्णत्वास जाऊन वाघोली रोड तसेच परिसरातील वाहतूक सुरळीत आणि सोयीस्कर होण्यास मदत होणार असल्याचे कटके म्हणाले.
यावेळी पुणे महानगरपालिका विकास समिती सदस्य शांताराम बापू कटके, संदीप आबा सातव, महावितरण चे सहाय्यक अभियंता दीपक बाबर, युवराज दौंडकर, अबीद शेख व कर्मचारी यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.