पुणे : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका सुरु करण्याचे आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी व तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांना आज शुक्रवारी (ता.३१) दिले आहेत. हे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी दिले आहेत.
मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन व वाहतूक व्यवस्था विचारात घेवून जास्तीत जास्त मतदारांना निवडणूकीमध्ये सहभाग नोंदवता यावा. यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कक मधील तरतुदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात, २५० किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच ज्या प्रकरणी सर्वोच्च / उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केलेले आहे.
राज्यातील सहकारी संस्था वगळून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका शासन आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्यावर असतील, त्या टप्प्यावर दिनांक ३० सप्टेंबर पर्यंत पुढे ढकललेल्या आहेत. त्यास अनुसरून प्राधिकरणाने उक्त संदर्भ क्र. २ अन्वये सदर शासन आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर कालावधी आज संपुष्टात येत आहे. तसेच शासनाकडून सदर निवडणूका आणखी पुढे ढकलण्याबाबतचे आदेश निर्गमित केले नाहीत.
दरम्यान,सहकारी संस्थांच्या निवडणूका ज्या टप्प्यावर पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या, त्या टप्प्यापासून सुरू कराव्यात. तसेच ज्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम अंतिम मतदार यादी प्रसिद्धीनंतर पुढे ढकलण्यात आलेला आहे, अशा सहकारी संस्थांचा सुधारित निवडणूक कार्यक्रम महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ चे नियम १८ मधील तरतुदीप्रमाणे तयार करुन प्राधिकरणाच्या मान्यतेस्तव सादर करावा. प्राधिकरणाकडून मान्यता प्राप्त झालेनंतर निवडणूक कार्यक्रमास व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी. असे आदेशात म्हटले आहे.