उरुळी कांचन, (पुणे) : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडल्यानंतर राज्याचे लक्ष आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. पुणे जिल्ह्यातील किमान आठ आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. माजी गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, दत्तात्रय भरणे, चंद्रकांत पाटील यांची नावे सध्यातरी जवळपास निश्चित मानली जात आहेत. याशिवाय आणखी किमान 6 आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत.
यामुळे पुणे जिल्ह्यात किती मंत्रिपदे व नवीन चेहरे कोण, याची उत्सुकता नागरिकांनी लागली आहे. भाजपमध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे, राहुल कुल, माधुरी मिसाळ, तर अजित पवार गटाकडून सुनील शेळके यांच्या नावांची चर्चा आहे. अजित पवार गटाकडून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच मावळचे आमदार सुनील शेळके यांना मंत्रिपदाची संधी मिळणार का? याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या सर्व इच्छुकांनी मंत्रिपदासाठी आपापल्या पद्धतीने फिल्डिंग लावली आहे. याबरोबरच पुण्याचे पालकमंत्रीपद कोणाला व कोणत्या पक्षाला मिळते, याबाबतही मोठी उत्सुकता आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ने महायुतीच्या विजयात चांगलाच हातभार लावलेला असल्याने महिलांमध्ये मंत्रिपदासाठी माधुरी मिसाळ यांचे नाव चर्चेत आहे.
पुणे जिल्ह्याचे सध्याचे चित्र पाहिल्यास 21 विधानसभा मतदारसंघांपैकी 9 ठिकाणी भाजप, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 ठिकाणी आमदार निवडून आले आहेत. शिंदें शिवसेना1, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष- 1, अपक्ष-1 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 1 आमदार निवडून आला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यामध्ये भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार कमी आहे.
मंत्रिमंडळामध्ये जिल्ह्यात मंत्रिपदे किती व पालकमंत्री कोण, याबाबत उत्सुकता आहे. येत्या शनिवारी (ता. १४) मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. इच्छुकांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार या तीनही नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. मंत्रिपदांबरोबर खातेवाटप हाही कळीचा मुद्दा ठरणार आहे. नेत्यांना विभागीय समतोल व सर्वांना न्याय देताना मोठी कसरत करावी लागणार आहे. जिल्ह्याचे भौगोलिक महत्त्व लक्षात घेता महायुतीच्या तीनही पक्षांचे तीन मंत्री नक्कीच असतील, अशी शक्यता आहे.