drumstick benefits : मुंबई : आपला देश हरीत क्रांतीने समृद्ध आहे. जगाला आवश्यक असणारी अनेक फळे, भाज्या, मसाले आणि औषधी वनस्पतींची भारतातून इतर देशांत निर्यात केली जाते. ज्यात शेवग्याच्या शेंगांचादेखील समावेश आहे. अनेकजणांना शेवग्याच्या शेंगा आवडत नाही. मात्र, खुद्द देशाचे पंतप्रधान मोदीसुद्धा आवडीने ही भाजी खातात. सध्या तर शेवग्याच्या पराठ्याचीही खास चर्चा आहे. दोन वर्षांपूर्वी फिट इंडिया मोहिमेनिमत्ताने बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपण शेवग्याचे पराठे खातो, असे आवर्जून सांगितले होते. पुन्हा तो जुना व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला.
जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आहाराचा एक भाग म्हणून शेवग्याच्या पराठ्यांचा उल्लेख केला. तेव्हापासून शेवग्याच्या शेंगाकडे लक्ष वेधले आहे. विशेषत: वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचं भाग म्हणून या शेंगांकडे पाहिले जात आहे. शेवग्याच्या शेंगांत भरपूर प्रमाणात प्रोटीन, अमिनो अॅसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शिअम, फायबर, सोडिअम आणि वेगवेगळे फीनॉलिक असतात.
शेवग्याच्या केवळ शेंगांचा नाही, तर त्यांच्या पानांचादेखील भाजीसाठी वापर केला जातो. त्याच्या पानातदेखील अनेक पौष्टिक घटक आढळतात. शेवग्याच्या शेंगेमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. लठ्ठपणा आणि अतिरिक्त साठलेली चरबी कमी करण्यास याची मदत होते. शेवग्याचे झाड त्याच्या मुळापासून ते शेंगापर्यंत फायदेशीर आहे.
शेवग्याचा वापर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी केला जातो. ड्रमस्टिकच्या पानांमधील अँटिऑक्सिडेंट क्लोरोजेनिक अॅसिड रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. या पाल्यात दाह कमी करणारे गुण असतात, त्यामुळे मधुमेहींनी या पाल्याचे सेवन करावे. शेवग्याच्या पाल्यात क आणि ई ही जीवनसत्त्वे असतात. शेवग्याच्या शेंगाच्या झाडामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयर्न यांसारखे आवश्यक पोषक घटक असतात. ही जीवनसत्त्वे अँटीऑक्सिडंटचे काम करतात. शेवग्याच्या पाल्यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. या पाल्यामुळे त्वचेत नव्या पेशींची निर्मिती व्हायला मदत होते, जे अधिक कॅलरी बर्न करू शकते व पचनक्रिया सुधारते.