पुणे : आयटी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळवून आयुष्यात स्थिरावण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पुण्यातील तरुणाला सायबर गुन्हेगारांनी चांगलाच गंडा घातला आहे. मोबाईलवर आलेल्या एका मेसेजवर विश्वास ठेवल्यामुळे या तरुणाची तब्बल 1 लाख 22 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पीडित तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,पुण्यातील वारजे माळवाडी भागात राहणाऱ्या या तरुणाच्या मोबाईलवर काही दिवसांपूर्वी एक मेसेज आला होता. त्यामध्ये “देशातील एका प्रसिद्ध आयटी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे,” असा दावा करण्यात आला होता. चांगल्या रोजगाराच्या आशेने तरुणाने त्या मेसेजमधील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला.

संवाद साधताना चोरट्यांनी त्याला जाळ्यात ओढण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या. नोकरीची निवड प्रक्रिया, प्रक्रिया शुल्क आणि सुरक्षा ठेव म्हणून काही रक्कम भरावी लागेल, असे त्याला सांगण्यात आले. नोकरीच्या मोहापायी तरुणाने विचार न करता वेळोवेळी चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात एकूण ,122,000 रुपये जमा केले.
पैसे ट्रान्सफर केल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी जेव्हा तरुणाने पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा समोरील सर्व मोबाईल क्रमांक बंद असल्याचे आढळले. आपली मोठी फसवणूक झाली आहे आणि आयटी कंपनीतील नोकरीचे स्वप्न केवळ एक बनाव होते, हे लक्षात येताच तरुणाला मोठा धक्का बसला.
याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात सायबर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून नागरिकांनी कोणत्याही अनोळखी मेसेज किंवा नोकरीच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.






