मुंबई : दिल्लीतील जंतर मंतरवर गेल्या 36 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी अनेक संकटांवर मात करत आपला लढा सुरू ठेवला होता. अखेर CJP च्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आज मुंबईत दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क ते श्री सिद्धिविनायक मंदिरादरम्यान एका भव्य विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे बंधूंच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली निघणार आहे. राज ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार, या रॅलीत कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे वापरले जाणार नाहीत, तर ही केवळ विद्यार्थ्यांच्या यशाची रॅली असणार आहे.

दरम्यान, या रॅलीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे यांच्या टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या टी-शर्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हिटलरच्या वेशात छापण्यात आला असून ‘हिटलर का बेटा झुटलर’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे. देशपांडे यांनी सांगितले की, “हे टी-शर्ट GEN Z च्या तरुणाईपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आले आहे.” या टी-शर्टमुळे सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
रॅलीच्या पार्श्वभूमीवर दादर आणि शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष सूचना व मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.






