नागपूर: नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच मेयो रुग्णालय परिसरातील उपहारगृहांवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. परिसरातील श्री बालाजी उपहारगृहात तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि स्वच्छतेसंदर्भातील गंभीर त्रुटी आढळून आल्याने प्रशासनाने हे उपहारगृह बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत स्वयंपाकघर तसेच अन्न वाढण्याच्या ठिकाणी अस्वच्छता आढळली. त्याचबरोबर कचरा व्यवस्थापनाची योग्य व्यवस्था नसल्याचेही निदर्शनास आले. उपहारगृहाकडे अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत आवश्यक वैध परवाना नसल्याचेही तपासात स्पष्ट झाले. याशिवाय पाण्याच्या तपासणीचा अहवाल उपलब्ध नसणे आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीचे अहवाल नसणे, अशा विविध त्रुटी आढळून आल्या.

मेयो रुग्णालय परिसरात विद्यार्थी, रुग्ण, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर, कर्मचारी आणि इतर नागरिकांची मोठी वर्दळ असते. दररोज सुमारे १५ हजार नागरिकांची ये-जा होत असल्याने परिसरात विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता महत्त्वाची ठरते. त्यामुळे प्रशासनाने उपहारगृहांच्या परवान्यांसह स्वच्छतेचीही तपासणी सुरू केली आहे.

याच तपासणीदरम्यान मेडिकल कॉलेज परिसरातील चार उपहारगृहांपैकी तब्बल तीन उपहारगृहांकडे अन्न व औषध प्रशासनाचा आवश्यक परवाना नसल्याचे समोर आले. त्यापैकी एका उपहारगृहाला परवाना नसल्यामुळे तातडीने बंद करण्याची सूचना देण्यात आली आहे. तर उर्वरित दोन छोट्या उपहारगृहांना आवश्यक परवाना मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
श्री बालाजी उपहारगृहात महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी चहा, नाश्ता आणि जेवणासह विविध खाद्यपदार्थांची विक्री केली जात होती. मात्र, आवश्यक परवाना नसतानाही व्यवसाय सुरू असल्याचे आढळल्याने कारवाई करण्यात आली. संबंधित कागदपत्रे आणि आवश्यक अहवाल साद करून सर्व त्रुटी दूर करेपर्यंत उपहारगृह बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मेयो रुग्णालयाच्या पाहणीला नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी विविध विकासकामांची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेतला होता. त्यानंतर रुग्णालय परिसरातील उपहारगृहांवर झालेल्या या कारवाईमुळे अन्न सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.







