राहुलकुमार अवचट
यवत : उन्हाळा,पावसाळा , हिवाळा, या तिन्ही काळात भल्या पहाटे कोणी सायकलवरुन तर कोणी पायदळ चालत घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करण्याचा नित्यक्रम पाळणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा १५ ऑक्टोबर हा सन्मान दिन माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’म्हणून यवत येथे पत्रकारांच्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी वृत्तपत्र विक्रेते राजेंद्र गुजर व मिनेश गुजर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी पोलिस अधिकारी बबन गायकवाड , पत्रकार विनायक दोरगे, मनोज खंडागळे , राहुलकुमार अवचट , अनिल गायकवाड , संदिप भालेराव , विजय कदम आदि मान्यवर उपस्थित होते
१९६० पासुन म्हणजे जवळपास गेल्या ६२ वर्षापासुन गुजर परिवाराच्या वतीने वृत्तपत्रे विक्रीची सेवा चालु असुन सध्या तिसरी पिढी ही सेवा पुरवित आहे , सुरूवातीला चालत , नंतर सायकलने तर सध्या मोटार सायकलने दररोज पहाटे कोणत्याही परिस्थितीत वृत्तपत्रे प्रत्येकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी प्रसंगी घरातील सुख – दुःखाचे विचार न करता प्रामाणिकपणे पार पाडत आहे.
दरम्यान, वृत्तपत्र विक्रेता ते देशाचे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास हा प्रेरणादायी आहे. त्यांचा जन्मदिवस हा ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’म्हणून साजरा होतो. हा वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सन्मानाचा दिवस आहे. त्यांनाही समाजात सन्मान लाभावा अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार एम. जी. शेलार यांनी गुजर कुटुंबाच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त करीत जुन्या अनेक गोष्टींना उजाळा देत वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी वृत्तपत्र विक्रेते राजेंद्र गुजर व मिनेश गुजर यांनी प्रथमच अशा प्रकारे सन्मान केल्याने पत्रकार बंधुचे आभार व्यक्त केले.