पुणे : भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने पर्यटकांसाठी जम्बो ऑफर दिली आहे. पर्यटकांसाठी टूर पॅकेज पुन्हा सुरू केली आहेत. यामुळे प्रवास्यांना देशांतर्गत अन् आंतरराष्ट्रीय सफरीचा योग्य दरात आनंद घेता येणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष टूर सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे रेल्वेने प्रवास्यांना पुन्हा सर्व सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसी पश्चिम विभागाने राजस्थान, दक्षिण भारत आणि पंजाबमधील काही प्रमुख देशांतर्गत टूर आणि दुबई आणि नेपाळमधील आंतरराष्ट्रीय टूर पुन्हा सुरू केले आहेत.
याबाबत बोलताना भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनचे पश्चिम विभागाचे अतिरिक्त महाव्यवस्थापक राजीव जैन म्हणाले, कोविडनंतर, आम्ही नुकतेच देशांतर्गत क्षेत्रातील लोकांसाठी ‘रॉयल राजस्थान’ आणि ‘दक्षिण (दक्षिण भारत) दर्शन’ यात्रा टूर आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील दुबई आणि नेपाळचे प्रवासयोजना सुरू केल्या आहेत. यापुढे आणखी काही ठिकाणे समाविष्ट केली जातील. जर पुण्यापासून १५० किमी अंतरावर अशी पर्यटन स्थळे असतील, जी देशाच्या इतर भागातून पर्यटकांना आकर्षित करतात, तर आम्ही पुण्यातही टूर सुरू करण्यास तयार आहोत.
दरम्यान, कोविडनंतर, आंतरराष्ट्रीय पर्यटन बाजारपेठदेखील उघडत आहे. आणि आम्ही बाली, मलेशिया आणि युरोप यासारखी इतर आंतरराष्ट्रीय स्थळे लवकरच जोडण्याच्या योजनांसह दुबई, थायलंड आणि नेपाळसह आमचे आंतरराष्ट्रीय टूर हळूहळू सुरू करत आहोत. आगामी दिवाळीच्या सुट्टीसाठी हि पॅकेजेसही सुरू होत आहेत. असे जैन यांनी सांगितले आहे.